Delhi Corona Update: दिल्लीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, गेल्या 24 तासात एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद
दिल्लीत झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोक चिंताग्रस्त झाले आहेत.
Delhi Corona Update : देशाची राजधानी दिल्लीत झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोक चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, अशातच एक दिलासादायक बातमी म्हणजे दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संखेयत जरी वाढ होत असली तरी आतापर्यंत रुग्णालयात एकूण सक्रिय रुग्णांपैकी तीन टक्क्यांहून कमी रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, 10 एप्रिलपर्यंत, दिल्लीत 608 सक्रिय कोरोनाचे रुग्ण होते. त्यापैकी फक्त 17 (2.80 टक्के) रुग्ण रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. मात्र, 16 एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या दुप्पट होऊन 1 हजार 262 झाली. परंतु रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या केवळ 29 (2.3 टक्के) होती. दोन दिवसांनंतर, दिल्लीमध्ये 1 हजार 729 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 40 (2.31 टक्के) रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या आधाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले आहे.
काल गेल्या 24 तासात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाची एक हजाराहून अधिक नवीन प्रकरणे आढळली आहेत. काल दिवसभरात दिल्लीत 1 हजार 9 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह, सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 641 वर पोहोचली आहे. दरम्यान, 24 तासात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून उपचारानंतर 314 जण बरे झाले आहेत. दिल्लीत कोरोना संसर्ग दर म्हणजेच पॉझिटिव्ह रेट हा 5.70 टक्क्यांवर गेला आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 622 रुग्ण आढळून आले आणि संसर्गाचा दर 4.42 टक्के होता.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 162 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 690 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात 132 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: