India Roads: 'हे' आहेत भारतातील सर्वात धोकादायक रस्ते; छोटीशी चूक ठरेल थेट मृत्यूला कारणीभूत!
प्रत्येक देशात रस्त्यांचं जाळं पसरलेलं आहे. रस्ते जगभरातील ठिकाणांना एकमेकांशी जोडतात, परंतु काही रस्ते इतके धोकादायक असतात की ते अनेकांच्या मृत्यूचं कारणही ठरतात. भारतातही असेच काही रस्ते आहेत.
Deadliest Roads In India : काही लोकांना गाडी चालवण्याची आवड असते आणि त्यामुळे त्यांना लाँग ड्राईव्हवर (Long Drive) जायला आवडतं, म्हणूनच असे लोक संधी मिळताच सहलीला (Picnic) जातात. भलेही तुम्ही फार उत्तम ड्रायव्हर असाल आणि खडबडीत रस्त्यांवर बराच काळ गाडी चालवण्याचा (Driving) तुम्हाला खूप अनुभव असेल, पण भारतात असे काही रस्ते आहेत ज्यावर गाडी चालवताना चांगल्या चांगल्या ड्रायव्हरला देखील घाम फुटतो. हे रस्ते इतके धोकादायक आहेत की त्यावरुन गाडी चालवताना चूक करुन अजिबात चालत नाही, कारण या रस्त्यावरुन गाडी चावलताना छोटीशी चूकही तुमचा जीव घेऊ शकते. अशाच काही धोकादायक रस्त्यांबद्दल जाणून घेऊया.
झोजी ला पास, जम्मू आणि काश्मीर
झोजी ला पास (Zoji La Pass) हा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि लेह दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता आहे. सुमारे 11,575 फूट उंचीवर असलेला हा धोकादायक रस्ता गाडी चालवण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. खराब हवामान आणि तुफान बर्फवृष्टी झाल्यास हा रस्ता बंद केला जातो. झोजी ला पास रस्त्याच्या बाजूची दृश्य अत्यंत नयनरम्य आहेत.
रोहतांग पास, हिमाचल प्रदेश
रोहतांग पास हा हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू खोऱ्याला लाहौल आणि स्पिती खोऱ्यांशी जोडणारा एक रस्ता आहे. ही पर्वतीय खिंड खूप उंचावर आहे आणि प्रचंड हिमवृष्टी, हिमस्खलन, अचानक खराब हवामानामुळे ही खिंड अतिशय धोकादायक मानली जाते. कधीही दरड कोसळण्याची शक्यता असल्याने येथे गाडी चालवणं अत्यंत धोकादायक मानलं जातं.
NH-5
NH-5 ला ग्रँड ट्रंक रोड म्हणून देखील ओळखलं जातं, जो देशातील सर्वात जुना आणि सर्वात लांब महामार्ग म्हणून देखील नावाजलेला आहे. या रस्त्याची लांबी 2,500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हा महामार्ग देशातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक आहे.
खारदुंग ला पास, लेह-लडाख
खारदुंग ला पास हा जगातील सर्वात उंच रस्ता म्हणून ओळखला जातो, जो समुद्रसपाटीपासून 5,602 मीटर उंचीवर आहे. हिवाळ्यात हा रस्ता बर्फाने झाकलेला असतो. या अरुंद रस्त्यावरुन कार आणि बाईक चालवण्यासाठी विशेष वेळ दिला जातो. हिमस्खलनाच्या धोक्यामुळे हा रस्ता देखील गाडी चालवण्यास धोकादायक आहे.
नाथुला पास, सिक्कीम
सिक्कीममधील हा रस्ता एवढा वक्र आहे की वाहनचालकांचीही गाडी चालवताना दमछाक होते. जर तुम्हाला मोशन सिकनेस असेल तर हा मार्ग तुमच्यासाठी नाही, कारण हा मार्ग रोलरकोस्टरपेक्षा कमी नाही. भूस्खलन आणि बर्फवृष्टीमुळे हा देशाच्या धोकादायक रस्त्यांपैकी एक आहे.
हेही वाचा:
Driving Tips : पावसात गाडीने प्रवास करताय? कार चालवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...