एक्स्प्लोर
पोलिसांनी हत्येचा कट उधळला, 'डी' गँगच्या चार शार्पशूटर्सना अटक

जामनगर : गुजरात पोलिसांनी दाऊद गँगचा एक मोठा कट उधळून लावला आहे. गुजरातमधील जामनगर येथील एका जहाज व्यवसायिकाची हत्या करण्याआधीच पोलिसांनी ‘डी’ गँगच्या चार शार्पशूटर्सना अटक केली. ‘डी’ गँगचा म्होरक्या रामदास रहाणे त्याच्या तीन सहकाऱ्यांसह जामनगर येथील जहाज व्यवसायिक अशफाक खत्री यांची हत्या करण्यासाठी गुजरातमध्ये आला होता. मात्र पोलिसांना ही बातमी समजली आणि त्यांनी ‘डी’ गँगचा कट उधळून लावला. चारीही आरोपी शिर्डीहून राजकोटला खाजगी बसने निघाले होते. मात्र तपासादरम्यान राजकोटच्या बाहेरच पोलिसांनी त्यांना अटक केली. गुप्तचर यंत्रणांनी चौघांबद्दलची माहिती अगोदरच गुजरात पोलिसांना पुरवली होती. रामदास रहाणे हा पाकिस्तानमध्ये असलेल्या दाऊदच्या भावाशी थेट संपर्कात होता आणि त्याने 10 लाख रुपयांमध्ये अशफाक खत्री यांना मारण्याची सुपारी घेतली होती, अशी माहिती आहे. महाराष्ट्रातून गुजरातच्या सीमेत प्रवेश करताच पोलिसांनी चौघांच्या बसचा पाठलाग सुरु केला. बसचा आणि चौघे बसलेला सीट नंबरही पोलिसांकडे होता. शिवाय जीपीएसच्या साहाय्याने पोलिसांनी बसचा पाठलाग केला आणि चौघांना बेड्या ठोकल्या.
आणखी वाचा























