(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Tauktae : मुंबई अन् गुजरातच्या दिशेनं 'तोक्ते' चक्रीवादळाची वाटचाल; देशातील इतर राज्यात परिस्थिती काय?
Cyclone Tauktae : कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पेहोचलं आहे.तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत.
नवी दिल्ली : केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनाऱ्यालगतच्या परिसरांत रविवारी धुमाकूळ घातल्यानंतर आता तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढं सरकत आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोकणातही याचे पडसाद पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी समुद्राचं पाणीही गावांत आल्याचं पाहायला मिळालं. या घटनांमुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले. अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
अनेक नागरिकांचं स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आलं. हे चक्रीवादळ आता हळूहळू गुजरातच्या दिशेनं पुढे सरकत आहे. सध्या चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटर आणि गुजरातपासून 400 किलोमीटर दूर आहे. पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जातं आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.
कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या भागांत मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की, चक्रीवादळ तोक्तेमुळे 17 मे रोजी मुंबईसह, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसचे कर्नाटक, गोव्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरल, कर्नाटकातील काही भागांत पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारी भागांत आणि गुजरात, असम, मेघालयच्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार, मराठवाडाच्या काही भागांतही पावसाच्या सरी कोसळू शकतात. सिक्किम, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या काही भागांतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
'निसर्ग'पाठोपाठ 'तोक्ते'चं संकट
मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाशी दोन हात केल्यावर आता यंदाच्या वर्षी राज्याला तोक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला. या वादळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडूनही तयारी करण्यात आली. अरबी समुद्रात तयार झालेलं हे तोक्ते चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.
दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाचे थेट परिणाम केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांत दिसून आले, किंबहुना अद्यापही ही क्षेत्र वादळामुळं प्रभावित आहेत. हे चक्रीवादळ 18 मे पर्यंत गुजरात किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :