(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम दिल्लीतही, तब्बल 45 वर्षातील सर्वाधिक पाऊस, देशातील इतर राज्यांत काय परिस्थिती?
Cyclone Tauktae : दिल्लीत कालपासून पावसाची संततधार कोसळत आहे. अशातच दिल्लीत बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत 6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ही मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद आहे.
Cyclone Tauktae : महाराष्ट्र, गुजरातनंतर तोक्ते चक्रीवादळानं उत्तरेकडे कूच केली आहे. आता तोक्ते वादळाचा तडाखा देशातील उत्तरेकडील राज्यांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीत कालपासून सतत पाऊस पडत आहे. दिल्लीत बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत 6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ही मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद आहे. यापूर्वी 24 मे 1976 रोजी एका दिवसात सर्वाधिक पाऊस पडला होता. दिल्लीत बुधवारी 23.8 डिग्री सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, जे मे महिन्यातील 1951 पासूनचं आतापर्यंतचं सर्वात कमी तापमान आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील एका आठवड्यासाठी दिल्लीतील तापमान असचं राहणार आहे. दिल्लीतील बदललेल्या हवामानामुळं दिल्लीच्या वेशींवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या तंबूंनाही नुकसान पोहोचत आहे. सिंघु, टिकरी आणि गाजीपूर बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अचानक आलेल्या पावसाचा सामना करावा लागला. दरम्यान, दिल्लीत पावसाची संततधार सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडूनही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशातील हवामान
आज उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या काही भागांत, दिल्ली, उत्तर पूर्व राजस्थानाच्या काही भागांत, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि अंदमान-निकोबार बेटांवर हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उत्तर पूर्व भारत, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडु, कोकण आणि गोवा, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांत, दक्षिण पूर्व राजस्थान, मध्यप्रदेश, लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, लद्दाख, गुजरात, छत्तीसगढ़, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, तोक्ते चक्रीवादळापाठोपाठ आणखी एक वादळ भारताकडे कूच करत आहे. 'यास' वादळ 26 ते 27 मेपर्यंत पूर्वेकडील किनाऱ्यांवर आदळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 72 तासांनी त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसम आणि मेघालयात 25 मे रोजी पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :