Cyclone Michaung : दक्षिण भारतात 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे हाहाकार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, चेन्नईला पावसाने झोडपलं
Cyclone Michaung : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसामुळे कहर माजल्याचं चित्र आहे. दरम्यान या चक्रीवादळात ने शॉक लागून त्याचप्रमाणे झाडं पडल्यामुळे एकूण 5 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आलीये.
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर झालं असून आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिसाच्या (Odisa) किनारी भागात या चक्रिवादळाचा तडाखा बसत असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान हे 'मिचॉन्ग' चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी किनारपट्टीला धडकणार असल्याचं चेन्नई आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यातच ग्रेटर चेन्नई (Chennai) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे शॉक, झाड पडणे यांसारख्या विविध कारणांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय.
Greater Chennai Police says five deaths have occurred due to various reasons including electrocution and falling of trees, as the city reels under the effect of cyclone #Michaung. pic.twitter.com/i3ZUsqcVJv
— ANI (@ANI) December 4, 2023
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मिचॉन्ग चक्रीवादळाची तीव्रता मंगळवार 5 डिसेंबर रोजी आणखी वाढेल. तसेच हे वादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
चेन्नईमध्ये पावसाची जोरदार बॅटींग
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या बहुतांश भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. येथील सखल भागात मोठा पूर आल्याचं पाहायला मिळालं. चेन्नईत रात्रभर मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या. ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळणार असल्याचे दक्षिण रेल्वेने जाहीर केले आहे. चेन्नई विमानतळावरील धावपट्टीवर देखील पाणी तुंबल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं ही बंगळूरच्या दिशेने वळवण्यात आली. दरम्यान चेन्नई विमानतळावरील धावपट्टी ही मंगळवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
किनारी भागात हवामान विभागाचा अलर्ट
तामिळनाडू, चेन्नई आणि ओडिसा किनारी भागातील नागरिकांना आणि मच्छीमारांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेन्नईमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्येही शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये ताशी 13 किमी वेगाने वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे येत्या काही तासांता वाऱ्यांचा वेग वाढणार असून 75 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळाचा धोका
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ मिचॉन्ग गेल्या सहा तासांमध्ये 13 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकलं आहे. 3 डिसेंबरला रात्री 11.30 वाजता चक्रीवादळ अक्षांश 12.8°N आणि रेखांश 81.6°E जवळ केंद्रीत झालं होतं. हे क्षेत्र पुद्दुचेरीपासून सुमारे 210 किमी पूर्व-ईशान्य, चेन्नईच्या 150 किमी पूर्व-आग्नेय, नेल्लोरच्या 250 किमी आग्नेय, बापटलापासून 360 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि मछलीपट्टनमच्या 380 किमी दक्षिण-पूर्वेस आहे.