अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, येत्या 24 तासात चक्रीवादळात रुपांतर होण्याची भीती
महाराष्ट्राच्या दक्षिण आणि उत्तर किनारपट्टी परिसरात पुढील दोन दिवस ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पणजी : दक्षिण पूर्व आणि लक्षद्वीप तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर दिशेने सरकला आहे. लक्षद्वीपपासून 240 किलोमीटर, मुंबईपासून 760 किलोमीटर तर वेरावळपासून 930 किलोमीटर अंतरावर आहे. पुढच्या 24 तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. तर पुढल्या 72 तासात ते वादळ उत्तर आणि वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे.
सौराष्ट्र, कच्छमध्ये 13 आणि 14 जून रोजी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कोकण आणि गोवा परिसरातील तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिण आणि उत्तर किनारपट्टी परिसरात पुढील दोन दिवस ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे.