Coronavirus India Updates : देशात गेल्या 24 तासात 19 हजार रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्येतही घट
Coronavirus India Updates : गेल्या साडेतीन महिन्यांपासून सलगपणे देशातील कोरोना रुग्णसंख्या ही 50 हजारांच्या आता आहे. तर देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही 0.70 टक्के इतकी झाली आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 19 हजार 740 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्या आधी गुरुवारी देशात 21 हजार 257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 271 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील सक्रिय रुग्णसंख्याही घसरली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णसंख्या ही दोन लाख 36 हजार 643 इतकी आहे. गेल्या सात महिन्यातील ही सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या असून एकूण रुग्णसंख्येचा विचार करता त्याचे प्रमाण हे 0.70 टक्के इतकं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत कोरोना लसीचे जवळपास 94 कोटी डोस देण्यात आले आहेत. तसेच सध्या 8.51 कोटी डोस शिल्लक आहेत.
महाराष्ट्रात 8.52 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण
महाराष्ट्रात आठ कोटी 51 लाख 99 हजार 386 नागरिकांनी लसीचे डोस घेतले आहेत. यात पाच कोटी 94 लाख 64 हजार 201 जणांनी पहिला तर दोन कोटी 57 लाख 35 हजार 167 जणांनी दुसरा डोस घेतला. सध्या वेगाने लसीकरण सुरू असून राज्य सरकारचा नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. सध्या शहरी भागात तुलनेने जास्त प्रमाणात रुग्ण आढळत असून ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी झालेली पहायला मिळत आहे. विदर्भात काही जिल्ह्यात तर एकाही रुग्णांची नोंद आज झाली नाही. मराठवाड्यातही रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि पुणे, मुंबई आणि उपनगरांत जास्त रुग्ण आढळत आहेत.
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी दोन हजार 620 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन हजार 943 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 97 हजार 018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. दरम्यान, राज्यात काल 59 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 33 हजार 11 सक्रिय रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Vaccine : दुसऱ्या डोसनंतर काही महिन्यातच लसीचा प्रभाव संपतो, बूस्टर डोस अत्यावश्यक; इस्त्रायलच्या संस्थेचा अभ्यास
- Corona Death : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार नुकसान भरपाई मिळणार, केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
- Coronavirus : पूर्ण लसीकरण झालेला व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता 11 पटींनी कमी; अमेरिकेच्या CDC चा अहवाल