(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Update : कोरोनाची चौथी लाट येणार का? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
Coronavirus Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच देशातील कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Coronavirus Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच देशातील कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. पण कोरोना संपला आहे की? कोरोनाची आणखी एक लाट येणार आहे? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडला आहे. यावर तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच अभ्यासात अनेक खुलासे समोर आले आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचे समोर आले आहे. पुढील तीन महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते. पण लसीकरणामुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी असेल. कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आल्यास मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अन्यथा चौथी लाट आली तरी ती सौम्य असेल.
चेन्नई येथील गणितीय विज्ञान संस्थान (आयएमएससी) चे प्राध्यापक सिताभरा सिन्हा म्हणाले की, ‘‘गेल्या काही दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहाता कोरोनाची चौथी लाट येईल याबाबत निश्चितपणे सांगू शकत नाही.’’ आयआयटी कानपूरच्या नवीन मॉडलच्या अभ्यासानुसार, कोरोना महामारीची चौथी लाट 22 जून पासून ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरमधील संशोधक एस. प्रसाद राजेश भाई, शुभ्र शंकर धर आणि शलभ यांच्याद्वारा करण्यात आलेल्या अभ्यासात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोकाही सांगण्यात आला आहे.
भारतात कोरोना रुग्णांवर सुरुवातीपासून लक्ष ठेवणाऱ्या गौतम मेनन यांनी सांगितले की, ‘‘ चौथ्या लाटेच्या सांगण्यात येत असलेल्या वेळेबाबत संभ्रम आहे.’’ हरियाणा येथील अशोका विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या मेनन यांनी सांगितले की, ‘‘तारीख आणि वेळ सांगणाऱ्या कोणत्याही अंदाजावर मी विश्वास ठेवत नाही. भविष्याबाबत आपण कोणताही अंदाज व्यक्त करु शकत नाही. कारण येणारा नवीन व्हेरियंट अज्ञात आहे, त्याबाबत आपल्याला कोणताही माहिती नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव आणि वेग आपल्याला माहित नाही. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या व्हेरियंट आणि कोरोना लाटेबाबत अंदाज व्यक्त करणे चुकीचं आहे. ’’ आरोग्य तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनाही यावर आपली सहमती दर्शवली आहे.