लॉकडाऊन-2चा पहिला दिवस, सरकार आज मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी राबविलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा पहिला टप्पा काल संपला. आजपासून लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लॉकडाऊन 1 च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमावरी देशाला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 25 मिनिटांच्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं कठोर पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात येणार आहे.
20 एप्रिलनंतर या ठिकाणी लॉकडाऊन शिथील होणार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 3 मेपर्यंत आपल्या सर्वांना, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावं लागेल. पुढच्या एका आठवड्यात कोरोना विरोधातील लढाईमध्ये नियम आणखी कठोर करण्यात येतील. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्हा, ठिकाण आणि राज्यावर बारिक नजर ठेवली जाईल. तिथे लॉकडाऊनचं किती पालन होत आहे, त्या क्षेत्राने कोरोनापासून स्वतःला कितपत वाचवलं आहे, हे पाहिलं जाईल. तसेच ते म्हणाले की, जी क्षेत्र या अग्निपरीक्षेत सफल होतील, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांची हॉटस्पॉटमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता कमी असेल तिथे 20 एप्रिलपासून काही आवश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.
VIDEO | तीन मे पर्यंत लॉकडाऊन का वाढवण्यात आला? पहिल्या 20 दिवसात लॉकडाऊनचा काय परिणाम झाला? स्पेशल रिपोर्ट
लॉकडाऊन-2मध्ये या गोष्टी असतील वेगळ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की, आता कोरोनाला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत नव्या ठिकाणी पसरू द्यायचं नाही. स्थानिक स्थरावर आता जर एकही रूग्ण वाढला तर आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला हॉटस्पॉटबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यावरही आपल्याला नजर ठेवणं आवश्यक आहे. देशात नवे हॉटस्पॉट वाढणं आपले परिश्रम आणि आपल्या तपस्येला आव्हान देणारं ठरेल.
शिस्तबद्ध पद्धतीने लॉकडाऊन-2चं पालन करा : मोदी
तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. एवढचं नाहीतर प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या कर्तव्याचं पालन केलं आहे. असंच नियमांच पालन आपल्याला करायचं असल्याचं पतंप्रधानांनी सांगितलं. तसेच देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे अखेर देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.