(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Corona : धोका वाढतोय! देशात 20,044 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा 1 लाख 40 हजारांपार
Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 20,044 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
India Corona Updates : जगभरात अद्यापही कोरोनाचा फैलाव सुरु आहे. भारतातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सक्रिय कोरोना रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20,044 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे पावसामुळे वाढणारे संसर्गजन्य आजारांचा धोका दुसरीकडे देशात झालेला मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव आणि त्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
गेल्या 24 तासांत 56 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 25 हजार 660 वर पोहोचला आहे. आदल्या दिवशी देशात 20 हजार 38 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 47 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
#COVID19 | India reports 20,044 fresh cases, 18,301 recoveries, and 56 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 16, 2022
Active cases 1,40,760
Daily positivity rate 4.80% pic.twitter.com/lvMcyWZ0ti
शुक्रवारी महाराष्ट्रात 2 हजार 914 जणांची कोरोनावर मात
महाराष्ट्रात शुक्रवारी राज्यात 2371 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 2 हजार 914 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात राज्यात 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. मागील काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृताची संख्या वाढत आहे. गुरुवारी राज्यात फक्त चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी यामध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. राज्यात शुक्रवारी 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या