Corona Vaccination | देशात चार कोटी लोकांना कोरोनाची लस, लसीकरणाच्या कार्यक्रमाने घेतला वेग
कोरोना (Corona) महामारी विरुद्ध लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण शिखर गाठल्याचं दिसून येतय. आतापर्यंत एकूण चार कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस (Corona Vaccination) देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारतात अलिकडच्या काही काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येतंय. भारतात आतापर्यंत चार कोटीच्या वर लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतंय.
आतापर्यंत चार कोटी 20 लाख 63 हजार 392 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 77 लाख 6 हजार 839 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 48 लाख 4 हजार 285 लोकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील एक कोटी 59 लाख 53 हजार 973 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या 32 लाख 23 हजार 612 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
लसीकरण मोहिमेच्या 63 व्या दिवशी 27,23,575 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 18 मार्चपर्यंत, देशभरात देण्यात आलेल्या लसींच्या एकूण डोसची संख्या तीन कोटी 93 लाख इतकी होती. जगात कोणत्याही देशाने दिलेल्या लसीच्या डोसच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे.
आतापर्यंत दिलेल्या लसीच्या दुसऱ्या डोसपैकी 68 टक्के डोस हे दहा राज्यांमध्ये देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात दिलेल्या लसीच्या 27.23 लाख डोसपैकी 80 टक्के डोस हे 10 राज्यांमध्ये देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत नोंदविण्यात आलेल्या नवीन रुग्णांपैकी 83.7 टक्के रुग्ण हे या सहा राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 40,953 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 25,681 इतक्या सर्वाधिक संख्येने नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल पंजाबमध्ये 2,470 तर केरळमध्ये 1,984 नवीन रुग्ण आढळले आहेत.
दररोजच्या कोरोना रुग्णसंख्येच्या नवीन प्रकरणांचा वाढता आलेख आठ राज्यांमध्ये दिसून येतो. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांचा समावेश होतो. केरळमध्ये सातत्याने रुग्णसंख्येत घसरण दिसून येत आहे.
देशातील कोरोनाची एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज 2,88,394 वर पोहचली, जी एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 2.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 17,112 ने वाढ झाली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये भारताच्या एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या 76.22 टक्के आहे. देशात आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,11,07,332 वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96.12 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 23,653 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या चोवीस तासांत 188 मृत्यूची नोंद झाली आहे. नवीन मृत्यूंमध्ये पाच राज्यांचे प्रमाण 81.3 टक्के आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 70 मृत्यूंची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये काल 38 तर केरळमध्ये 17 मृत्यूची नोंद झाली आहे.
पंधरा राज्यांत गेल्या 24 तासांत एकही कोविड19 मृत्यूची नोंद झालेली नाही. यामध्ये आसाम, उत्तराखंड, ओदिशा, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, सिक्किम, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मणिपूर, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश होतोय.
संबंधित बातम्या :
- राज्यात आज कोरोना बाधित रुग्णसंख्येचा विस्फोट! तब्बल 27 हजार 126 रुग्णांचे निदान
- Aditya Thackeray Corona Positive | पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण, ट्वीटद्वारे दिली माहिती