(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Vaccine Guidelines: 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाकरे यांची महत्वाची प्रतिक्रिया....
1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत केंद्र सरकारने लसीकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Corona Vaccination Phase 3: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18 वर्षांवरील सर्वांना लसीसह केंद्राचे 'हे' देखील महत्वाचे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. देशात लसीकरण वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
सर्वांना कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी देशभरातून केली जात आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लसीकरणाबाबत हे ही महत्वाचे निर्णय
- लस उत्पादक कंपनी कडून राज्यांना थेट पुरवठाही होऊ शकणार आहे.
- लस आता निर्धारित किमतीत खुल्या बाजारातही विकत घेता येणार.
- 50 टक्के साठा दर महिन्याला केंद्राला आणि 50 टक्के साठा राज्य किंवा खुल्या बाजारात विक्री लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या करू शकतात
- 1 मे नंतर प्रत्येक ठिकाणच्या नोंदणीत प्राधान्य 45 वर्षांपेक्षा अधिकच्या लोकांच्या दुसऱ्या डोसला असणार आहे.
- पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वयोगट, फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स यांनाच मोफत लस
- याशिवाय लस उत्पादकांना 50 टक्के साठा राज्य सरकारला द्यावा लागणार
- देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे.
- सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी 250 रुपये आकारले जात आहेत.