(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Nyay Yatra: 'भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक', काँग्रेसकडून लोगो जारी
Bharat Jodo Nyay Yatra: 14 जानेवारी रोजी मणिपूरमधून काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात करणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार असून ही यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांमधून जाईल.
मुंबई : काँग्रेसेच नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरु होणार आहे. 14 जानेवारी रोजी मणिपूरमधून (Manipur) या यात्रेला सुरुवात होईल. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून शनिवार 6 डिसेंबर रोजी भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो जारी करण्यात आला आहे. भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक, असा नारा या लोगोद्वारे देण्यात आलाय. हा लोगोचे दोन भाग करण्यात आले आहेत. एका बाजूला भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) हे तिरंग्याच्या रंगात लिहलं आहे. तर दुसऱ्या बाजूला न्याय का हक मिलने तक हा नारा निळ्या रंगात आहे.
14 जानेवारीला सुरु होणार यात्रा
या लोगो लॉन्च करण्याच्या कार्यक्रमावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, 14 जानेवारीपासून ही यात्रा सुरु होणार आहे. त्यांनी म्हटलं की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरु करणार आहोत. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मूलभूत प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली. या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं की, 'भारत जोडो न्याय यात्रा'चा लोगो लॉन्च करण्यात आलाय. 'भारत जोडो न्याय यात्रा' हे देशवासीयांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी एक मजबूत पाऊल आहे."
मणिपूरपासून सुरु होणार यात्रा
खरगे यांनी सांगितले की, काँग्रेसचा हा प्रवास हिंसाचारग्रस्त मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुरू होईल. या पदयात्रेचा एकूण मार्ग 6700 किलोमीटरचा असेल. हा 66 दिवसांचा प्रवास असेल आणि राहुल गांधी त्यांना दिवसातून दोनदा संबोधित करतील, असं त्यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत खरगे म्हणाले, 'मणिपूरमध्ये दुर्दैवी घटना घडल्या आणि घडत आहेत. पण रात्रंदिवस मोदीजी कधी समुद्रात जाऊन किंवा पोहायला जाऊन फोटो सेशन्स करतात, कधी मंदिरे बांधतात, तिथे जाऊन फोटो काढतात, कधी केरळमध्ये जाऊन फोटो काढतात तर कधी मुंबईत जाऊन फोटो काढतात.
राहुल गांधी जी के नेतृत्व में हम 14 जनवरी से 'भारत जोड़ो न्याय यात्रा' शुरू कर रहे हैं।
— Congress (@INCIndia) January 6, 2024
'भारत जोड़ो न्याय यात्रा' देश के सामाजिक, आर्थिक, राजनीतिक और बुनियादी मुद्दों को लेकर निकाली जा रही है।
: कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge pic.twitter.com/HAb20nHlBW
यात्रेचा प्रवास कसा असणार?
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, हा प्रवास मणिपूर, इम्फाळ येथून सुरू होणार असून नागालँड, आसाम आणि अरुणाचलसह देशातील 15 राज्यांमधून जाणार असून शेवटी मुंबईत पोहोचणार आहे. 110 जिल्ह्यांतून जाणारी ही यात्रा लोकसभेच्या 100 आणि विधानसभेच्या 337 जागांचा समावेश करेल. सुमारे 6700 किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत या यात्रेचा शेवट होणार आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मूलभूत प्रश्नांवर ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.