Loksabha Election 2024 : भाजपचा पंचायत टू पार्लमेंट प्लॅन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला नेतृत्वही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न
Loksabha Election 2024 : स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला नेतृत्व आपल्या बाजूने वळण्यासाठी भाजपकडून पंचायत टू पार्लमेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election 2024 ) तयारी सध्या देशात सुरु आहे. त्यातच आता भाजप (BJP) फक्त महिला मतदारच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला नेतृत्वालाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच एक भाग म्हणून न भाजपकडून आता देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधींना मोदींनी दिल्लीत घडवलेले परिवर्तन दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
या महिलांना नवे संसद भवन, राष्ट्रपती भवनाची भेट, विशेष प्रशिक्षण आणि भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याची संधी दिली जातेय. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पंचायतीमधील खास महिला लोकप्रतिनिधींसाठी केंद्र सरकार आणि महिला आयोगाच्या समन्वयाने राबवण्यात आलेला हा कार्यक्रम आहे. यामुळे भाजप केवळ महिला मतदारच नाही तर महिला नेतृत्वााठी देखील प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळंतय.
सहाशे महिला लोकप्रतिनिधी दिल्लीत
भाजपकडून पंचायत टू पार्लमेंट या कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महिला नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय.त्यासाठी देशभरातील सहाश महिला प्रतिनिधी दोन दिवस दिल्लीत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून 54 महिला लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. फक्त मतदारांपर्यंत मर्यादित विचार न करता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला नेतृत्वाला भाजप तयार करतय. कारण शेवटी महिला मतदारांच्या साथीनेच चारशे पार आकडा गाठता येईल, हे भाजपला माहितीये. त्या मतदारांना भाजपच्या बाजूने वळवण्यात महिला नगरसेविका, सरपंच, पंचायत समिती सदस्य मोठी भूमिका बजावणार आहेत.