I.N.D.I.A Alliance Seat Sharing : काँग्रेसकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार; महाराष्ट्र, दिल्ली, बिहारसह कोणत्या राज्यात किती जागांवर लढणार?
INDIA Alliance Seat Sharing : काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपांसाठी फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. समितीकडून काँग्रेस अध्यक्षांना जागा वाटपाबाबतचा अहवाल सोपवण्यात येणार आहे.
INDIA Alliance Seat Sharing : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha 2024) एकत्र विरोधकांच्या 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' म्हणजेच इंडिया आघाडीमधील (I.N.D.I.A. Alliance ) संभाव्य जागा वाटप आता समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Congress) देशभरातील 543 लोकसभा जागांपैकी 320 ते 330 जागांवर निवडणूक लढवू शकते. त्यापैकी सुमारे 250 जागा काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू शकते. तर 9 राज्यांमधील 75 जागांवर आपल्या मित्रपक्षांसोबत युती करू शकते.
काँग्रेसची समिती जागांबाबत आपला अहवाल पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य घटकांशी चर्चा केलेली काँग्रेसची ही समिती बुधवारी, 3 जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल देऊ शकते. त्यानंतर काँग्रेसकडून आघाडीतील मित्रपक्षांसोबत चर्चा होईल.
कोणत्या 9 राज्यात काँग्रेस आघाडीत लढणार?
ज्या नऊ राज्यांमध्ये काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत जागा वाटून घेणार आहे, त्यात दिल्ली, यूपी, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप यांच्यात युती होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इंडिया आघाडीतील संभाव्य जागा वाटप
राज्य आणि काँग्रेसचा किती जागांवर दावा?
आंध्र प्रदेश 25 : काँग्रेस 25
अरुणाचल प्रदेश 2: काँग्रेस 2
आसाम 14: काँग्रेस 14
बिहार 40: काँग्रेस 4, डावे 2, आरजेडी 17, जेडीयू 17
छत्तीसगड 11: काँग्रेस 11
गोवा 2: काँग्रेस (आप एक जागा मागू शकते)
गुजरात 26 : काँग्रेस 26 (आप पाच जागा मागू शकते)
हरियाणा 10: काँग्रेस 10 (आप दोन-तीन जागा मागू शकते)
हिमाचल प्रदेश 4: काँग्रेस 4
झारखंड 14: काँग्रेस 7, JMM 4, RJD, JDU, डावे 3
कर्नाटक 28: काँग्रेस 28
केरळ 20: काँग्रेस 16, स्थानिक पक्ष 4
मध्य प्रदेश 29: काँग्रेस 29
महाराष्ट्र 48: काँग्रेस 18, शिवसेना 15, राष्ट्रवादी 15
मणिपूर 2: काँग्रेस 2
मेघालय 2: काँग्रेस 2
मिझोराम 1 : काँग्रेस 1
नागालँड 1 : काँग्रेस 1
ओडिशा 21: काँग्रेस 21
पंजाब 13: काँग्रेस 13 / आप 13 ( या राज्यात युतीची शक्यता कमी आहे. काँग्रेस-आपची युती झाल्यास त्याचा भाजप-अकाली दलाला फायदा होऊ शकतो)
राजस्थान 25 : काँग्रेस 25
सिक्कीम 1: काँग्रेस 1
तामिळनाडू 39: काँग्रेस 9, द्रमुक 24, डावे 4, स्थानिक पक्ष 2
तेलंगणा 17: काँग्रेस 17
त्रिपुरा 2: काँग्रेस 2 (डाव्यांना एक जागा मिळू शकते)
उत्तर प्रदेश 80: काँग्रेस 8-10, समाजवादी पक्ष 65, स्थानिक पक्ष 5-7
उत्तराखंड 5: काँग्रेस 5
पश्चिम बंगाल 42: काँग्रेस 2-4, टीएमसी 38-40
जम्मू काश्मीर 5: काँग्रेस 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, पीडीपी 1
लडाख 1 : काँग्रेस 1
दिल्ली 7: काँग्रेस 3, आप 4
चंदीगड 1 : काँग्रेस 1
अंदमान 1, दादरा नगर हवेली 1, दमण दीव 1, लक्षद्वीप 1, पुद्दुचेरी 1 (एकूण 5): काँग्रेस 4, राष्ट्रवादी 1
काँग्रेसचे जागा वाटप सूत्र मान्य होणार?
विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या पाटणा, बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली येथे बैठकी झाल्या आहेत. या आघाडीसमोर जागा वाटपाचे मोठे आव्हान आहे. जानेवारीच्या अखेरीस जागावाटपावर अंतिम निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रादेशिक पक्षांकडून राज्यात अधिक जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेसने आपल्या बाजूने फॉर्म्युला तयार केला आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यावर काय होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल.