Congress President Election : थरुर की खर्गे, कोण सांभाळणार काँग्रेस? 24 वर्षानंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे.
Congress Presidential Elections : काँग्रेस आज ( बुधवार 19 ऑक्टोबर) नवीन अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान पार पडलं होतं. जवळपास 96 टक्के मतदारांनी आपला कौल मतपेटीत नोंदवला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत माझा विजय होईल असा विश्वास असल्याचे मत शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. तर ही मैत्रीपूर्ण लढत होती असं मत खर्गेयांनी व्यक्त केले आहे. पाहूयात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाचे मुद्दे....
1. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदान केलं होतं.
2. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री निवडणुकीनंतर म्हणाले की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. अध्यक्षपदाची निवडणूक ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक झाली आहे. 9,900 पैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केलंय जवळपास 96 टक्के मतदान झालेय. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
3. मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितलं की, 19 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची घोषणा केली जाईल. गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे कुणी कोणाला मतदान केलं? हे समजणार नाही.
4. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेमध्ये दरम्यान बेल्लारीच्या कँपमधून मतदानाचा हक्क बजावला. राहुल गांधी यांच्यासोबत इतर 50 मतदारांनी या कँपमधून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
5. अध्यक्षपदाच्या मतदानासाठी देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. देशभरात 68 मतदान केंद्रावरील मतपेट्या आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या बंद पेट्यांना दिल्लीमधील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे.
6. सीलबंद मतपेट्या उमेदवाऱ्यांच्या एजंटसमोर उघडण्यात येतील. बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
7. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य नाही. 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.
8. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेरची निवडणूक 2000 मध्ये पार पडली होती. त्यामध्ये सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये प्रसाद यांचा दारुण पराभव झाला होता. त्याआधी 1997 मध्ये शरद पवार, सीताराम केसरी आणि राजेश पायलट यांच्यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. सीताराम केसरी यांचा विजय झाला होता. शरद पवारांना पराभवाचा धक्का बसला होता.
9. सोनिया गांधी यांनी अनेक वर्ष काँग्रेस अध्यक्षपद सांभाळलं आहे. 2017 मध्ये राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाले होते. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 2019 पासून सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.
10. यावेळी काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्यामध्ये लढत आहे. मतदान झाल्यानंतर खरगे म्हणाले की, ही मैत्रीपूर्ण लढाई आहे तर शशी थरुर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.