Congress President : काँग्रेसला लवकरच मिळणार नवे अध्यक्ष, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु
Congress President Election : आजपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे.
Congress National President Election : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसला आता गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या दोन नाव चर्चेत आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत असून ही प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल. त्यानंतर याबाबतच चित्रं अधिक स्पष्ट होईल.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी दावेदार कोण ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नेते शर्यतीत असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या दोन नावांची विशेष चर्चा आहे. यामध्ये पहिलं नाव आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचं आणि दुसरं नाव आहे शशी थरुर (Shashi Tharoor) यांचं. यामध्ये अशोक गेहलोत यांचं पारड जड आहे. गेहलोत यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, पक्षश्रेष्ठी आपल्याला जी जबाबदारी देतील, ती आपण योग्यरितीने पार पाडू. त्याचवेळी, शशी थरुरू यांचंही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. दरम्यान मनीष तिवारीही अध्यक्षपदासाठी फॉर्म भरू शकतात, अशी चर्चा आहे.
अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहिर केलं आहे. या घोषणेसोबतच अशोक गेहलोत यांनी आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. गेहलोत यांनी स्पष्ट केलं आहे की, एक व्यक्ती एक पद यानुसार काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यास मी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार आहे. त्यामुळे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळं आता अशोक गेहलोत हे काँग्रसचे अध्यक्ष बनणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.