(Source: ECI/ABP News/ABP Majha)
छत्तीसगड सरकार 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांना 2500 मासिक बेरोजगार भत्ता देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Chhattisgarh Budget: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, छत्तीसगडच्या जनतेनं आम्हाला चार वर्षांपूर्वी निवडून दिलं आणि आम्ही अभिमानानं सांगतो की, आम्ही जनतेच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण केल्या आहेत.
Chhattisgarh Budget 2023: छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी सोमवारी विधानसभेत पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Chhattisgarh Budget 2023) सादर केला. वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी 18 ते 35 वर्ष वयोगटातील बेरोजगार तरुणांना दरमहा 2500 रुपये बेरोजगार भत्ता देण्याची घोषणा केली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, छत्तीसगडच्या जनतेनं आम्हाला चार वर्षांपूर्वी निवडून दिलं आणि आम्ही अभिमानानं सांगतो की, आम्ही जनतेच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण केल्या आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकरी, महिला आणि युवक, प्रत्येक घटकाला सक्षम केलं आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विधानसभेत बेरोजगारांसाठी मोठी घोषणा केली. अर्थसंकल्पात बेरोजगार भत्त्याची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री बघेल यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना भूपेश बघेल म्हणाले की, 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा 2500 रुपये बेरोजगार भत्ता दिला जाईल. अंगणवाडी सेविकांचं मानधन 6000 वरून 10 हजार रुपये आणि सहाय्यकांचे मानधन 3550 वरून 5000 रुपयांपर्यंत वाढवल्याची तरतूद बजेटमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री बघेल यांनी बजेटमध्ये मातांच्या उपचारासाठी 2200 रुपये देण्याची घोषणा केली आणि ग्राम पटेलांचा मासिक भत्ताही 2,000 रुपयांवरून 3,000 रुपये करण्यात आल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत अनुदानाची रक्कम 25,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात येत असल्याची मोठी घोषणा भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पातून केली.
नवा रायपूर ते दुर्ग अशी लाईट मेट्रो चालवण्याची घोषणा
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही बजेटमध्ये नवा रायपूर ते दुर्ग अशी लाइट मेट्रो चालवण्याची घोषणा केली आहे. राज्यात 101 नवीन स्वामी आत्मानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही मनेंद्रगड, जांजगीर, कावर्धा आणि गिदाममध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन केली जातील, असं सांगितलं आहे. 23 लाख शेतकऱ्यांकडून 107 लाख मेट्रिक टन धान्यांची खरेदी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी विधानसभेत दिली आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण आणि शेतकरी तसेच होमगार्डना होळीची भेट दिली आहे. सीएम बघेल यांनी अर्थसंकल्पात होमगार्ड्सचे पगार 6300-6420 रुपये करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री बघेल यांनी अर्थसंकल्पात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी 3238 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजनेंतर्गतही सरकारने अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.