India-China Talks : चीनच्या विमानांकडून LAC हवाई क्षेत्राचे उल्लंघन, भारताने दिला कडक इशारा
India-China Talks : गेल्या दीड महिन्यांपासून चीनची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर LAC च्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करत आहेत. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अनेकवेळा फॉरवर्ड एअर बेसवरून चिनी विमानांचा पाठलाग केला आहे.
India-China Talks : तैवान बळकावण्याच्या डावपेचात चीनकडून एलएसीवरही चितावणीखोर कारवाया सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून चीनची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर LAC च्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करत आहेत. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अनेकवेळा फॉरवर्ड एअर बेसवरून चिनी विमानांचा पाठलाग केला आहे. ड्रॅगनच्या या कृत्यांवर भारतानेही अधिकृतपणे आक्षेप घेतला आहे.
मंगळवारी पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC वर भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्सची महत्त्वपूर्ण बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीला लष्कराचे मेजर जनरल दर्जाचे अधिकारी आणि भारतीय वायुसेनेचे कमांडर दर्जाचे अधिकारीही उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत भारताच्या कमांडर्सनी नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) विमाने उडवल्याबद्दल चीनच्या लष्कराविरोधात नाराजी व्यक्त केली. यासोबतच चीनकडून प्रक्षोभक कारवाई सुरू राहिल्यास भारतही प्रत्युत्तराची कारवाई करू शकतो, असा इशारा भारताकडून देण्यात आला.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून चिनी सैन्य पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC वर युद्ध सराव करत आहे . दोन्ही देशांचे सैन्य एलएसीवर दरवर्षी हिवाळी हंगामापूर्वी लष्करी सराव करत असले तरी जून महिन्यापासून चीनची लढाऊ विमाने एलएसीच्या अगदी जवळून उड्डाण करत आहेत. चीनची लढाऊ विमाने LAC च्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करत आहेत. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. भारतीय वायुसेनेने एलएसीला लागून असलेला आपला हवाई तळही अलर्टवर ठेवला आहे. हवाई क्षेत्राच्या उल्लंघनादरम्यान, भारताच्या मिराज-2000 आणि मिग-29 या लढाऊ विमानांनीही चिनी लढाऊ विमानांना झोडपून काढले आहे.
LAC च्या हवाई क्षेत्राबाबत भारत आणि चीनमध्ये एक अलिखित करार आहे, ज्या अंतर्गत दोन्ही देशांची लढाऊ विमाने LAC च्या 10 किमीच्या आत उड्डाण करू शकत नाहीत. हेलिकॉप्टरची रेंज 5 किमी आहे. आपत्कालीन परिस्थितीत आजारी किंवा जखमी सैनिकाला एअर-लिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर एलएसीजवळ आले तर त्याची माहिती दुसऱ्या देशाच्या लष्कराला द्यावी लागते, मात्र चीन गेल्या दीड महिन्यांपासून असे करत नाही. यामुळेच मंगळवारच्या बैठकीत भारताने चीनच्या या कृत्यावर जोरदार आक्षेप घेतला.