Chandrayaan-3 | चांद्रयान-2 च्या प्रकल्प संचालिका एम.वनिता चांद्रयान-3 मोहिमेचा भाग नसणार
भारताची चांद्रयान-2 मोहिम यशस्वी होऊ शकली नाही. चांद्रयान-2 मोहिमेत पाठवण्यात आलेलं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँड होऊ शकलं नव्हतं. चांद्रयान-2 मोहिमेनंतरच वनिता यांची बदली करण्यात आली होती.
नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रकल्प संचालिका एम वनिता यांना चांद्रयान-3 मोहिमेत समाविष्ट करण्यात आलेलं नाही. इस्रोच्या वैज्ञानिक एम वनिता यांच्या जागी आता वीरामुतुवेल यांना चांद्रयान-3 मोहिमेत समाविष्ट करण्यात आलं आहे. चांद्रयान-3 मोहिमच्या प्रमुख म्हणून रितू करिधाल यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी असणार आहे. याआधी चांद्रयान-2 च्या संचालिका म्हणूनही करिधाल यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
भारताची चांद्रयान-2 मोहिम यशस्वी होऊ शकली नाही. चांद्रयान-2 मोहिमेत पाठवण्यात आलेलं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँड होऊ शकलं नव्हतं. चांद्रयान-2 मोहिमेनंतरच वनिता यांची बदली करण्यात आली होती. मात्र त्यांच्या बदलीचं कोणतंही कारण देण्यात आलं नव्हतं. एम.वनिता या उत्तम शास्त्रज्ञ असून त्यांची पॅलोड मॅनेजमेंट अँड स्पेस अॅस्ट्रोनॉमी एरियाचं (पीडीएमएसए) उप संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. तर त्यांच्या जागी पी वीरामुतुवेल यांनी चांद्रयान-3 मोहिमेत प्रकल्प संचालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती इस्रोने दिली.
याशिवाय इस्रोने उपप्रकल्प संचालकांमध्येही बदल केले आहेत. चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोकडून 29 उप प्रकल्प संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व चांद्रयान-3 मोहिमेत वेगवेगळी भूमिका निभावणार आहेत.
चांद्रयान-2 मोहिमेत चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी डेटा विश्लेषण केलं होतं. चांद्रयान-2 मोहिमेत फक्त लँडिंगमध्ये इस्रोला अपयश आलं आहे. या मोहिमेतील ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असून तो पुढची काही वर्ष कार्यरत राहील, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या : Chandrayaan 2 | इस्रो प्रमुख के सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधान मोदींनी धीर दिला! Chandrayaan-2 | विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा कायम, इसरोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु