CoWIN Management साठी केंद्र सरकारकडून मिळाल्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना
केंद्र सरकारनं भारतात कोरोना लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिल्यानंतर देशभरात लसीकरणाची तारीखही जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रानं कोविन व्यवस्थापनासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
नवी दिल्ली : अनेक महिने, किंबहुना जवळपास वर्षभराच्याच प्रतिक्षेनंतर अखेर आता कुठं कोरोनाच्या भीतीच्या वातावरणाला शह देत आशेचा किरण दिसू लागला आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेची सुरुवात होणार आहे. शासनाच्या निर्देशांनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे अशा विभागणी केलेल्या जवळपास 3 कोटी नागरिकांना प्राधान्यानं ही लस देण्यात येणार आहे. ज्यानंतर 50 वर्षे आणि त्या वरील वयोगटातील नागरिकांना कोमोर्बिड क्रमवारीनुसार 27 कोटी नागरिकांपर्यंत ही लस पोहोचणार आहे.
लसीकरणारची तयारी पूर्ण झालेली असतानाच आणि लस प्रत्यक्ष स्वरुपात हाती येण्याची वेळ समीप आलेली असतानाच रविवारी केंद्राकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. कोविन व्यवस्थापनाबाबतच्या या सूचना देत केंद्राकडून लसीकरणाच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल उचललं गेलं आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविन सॉफ्टवेअर आणि त्यातील तंत्रज्ञानासंबंधीची माहिती दिली. Empowered Group on Technology and Data Management च्या अध्यक्षपदी असणाऱ्या राम सेवक शर्मा, यांनी याबाबतची माहिती देत ही जगातील सर्वात मोठी लसीकरण प्रक्रिया असल्याची बाब स्पष्ट केली.
नागरिकांना प्राधान्य देणाऱ्या या प्रक्रियेत लस केव्हाही आणि कुठेही उपलब्ध करुन देणं हा मुख्य हेतू असल्याची बाब यादरम्यान नमूद करण्यात आली. कोविनबाबतच्या काही तांत्रिक गोष्टी स्पष्ट करत यामध्ये कोणत्याही प्रकारच्या 'प्रॉक्सी' नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय सर्वांनाच समात स्तरावर याचे फायदे मिळण्यावरही त्यांनी भर दिला.
आधार क्रमांकाच्या वापरासंदर्भातील माहिती देत असताना त्यांनी आपल्याकडून राज्यांना या प्रक्रियेत नोंदणीसाठी आधार क्रमांक आणि इतर माहितीसाठी एसएमएसचा वापर करण्यासाठीचा आग्रही सूर धरला. नागरिकांची माहिती घेत त्यानुसार कानाकोपऱ्यात कोरोनाची ही लस पोहोचवणं यामध्ये कोविन आणि माहिती- तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.