(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिनिव्हा करार : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला परत आणण्याचा मार्ग
भारताचा बेपत्ता असलेला वैमानिक पाकिस्तानकडेच असल्याच भारतानं मान्य केलं आहे. तसेच भारतीय वैमानिकाला सुखरुप आमच्याकडे सोपवा अशी मागणीही भारतानं पाकिस्तानकडे केली आहे.
नवी दिल्ली : भारताचा बेपत्ता असलेला वैमानिक पाकिस्तानकडेच असल्याच भारतानं मान्य केलं आहे. तसेच भारतीय वैमानिकाला सुखरुप आमच्याकडे सोपवा अशी मागणीही भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. जर भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असेल, तर तो पर येऊ शकतो का? आणि या संपूर्ण हालचालींदरम्यान जिनिव्हा कराराचा वारंवार उल्लेख होत आहे.
काय आहे जिनिव्हा करार?
युद्ध कैदी कुणाला म्हणावे, त्यांना कशी वागणूक द्यावी याचे आंतरराष्ट्रीय नियम ठरवले गेले आहेत. युद्धादरम्यान पकडल्या जाणाऱ्या लष्करी अधिकारी, जखमी जवान, संबंधित नागरिकांच्या अधिकाराचं रक्षण करणे हा उद्देश आहे. 1929 साली हा करार पहिल्यांदा अस्तित्वात आला. त्यात वेळेनुरुप बदल केले गेले. रेड क्रॉस या संस्थेनं यात पुढाकार घेतला. खास करुन दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धकैद्यांच्या छळाचा मुद्दा गाजला आणि 1949 साली आणखी काही बदल केले गेले, त्यानंतर 194 देशांनी या कराराला मान्यता दिली. युद्धकैंद्यांना कारावासात टाकता येत नाही तर फक्त युद्धात सहभागी होऊ नये म्हणून ताब्यात ठेवता येतं.
काय सांगतो हा करार?
सैनिक पकडला गेल्या क्षणी हा करार लागू होतो. युद्धकैद्याला त्याचा जन्म, जात, धर्माबद्दल विचारता येत नाही. अशा युद्धकैद्यांना फक्त त्यांचं नाव, नंबर, पद आणि युनिटबद्दल विचारता येतं. युद्धकैद्यांचा वापर जनतेच्या मनात रोष निर्माण करता येत नाही. युद्धकैद्यांसोबत अमानवी व्यवहार, छळ करण्यावर बंदी आहे. त्यांना भीती दाखवणे, धमकी देणे, त्याचा जीव धोक्यात येईल असे वर्तन करण्यावर बंदी असते. युद्धकैद्यांचा अपमान होईल असं वर्तन करता येत नाही. पकडलेल्या कैद्यांना वेळच्या वेळी खाण्यापिण्याची तसेच इतर मूलभूत सुविधा देणे बंधनकारक असतं. जखमी सैनिकावर योग्य उपचार करावे लागतात. युद्धकैद्यांवर वॉर क्राईमचा खटला दाखल करता येतो. अशा युद्धबंदीना कायदेशीर मदत देणं बंधनकारक असतं. युद्ध संपल्यावर युद्धकैद्यांना संबंधित देशाला तात्काळ सुपुर्द करणं बंधनकारक असतं.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या वैमानिक परत येणार?
जो व्हिडिओ पाक मीडियात फिरतोय त्यावरुन तरी जिनिव्हा कराराचं पालन होत आहे असं दिसत नाही. काही काळानंतर तो व्हिडिओ अधिकृत साईट्सवरुन हटवण्यात आला त्याचं कारणही तेच असावं. जिनिव्हा कराराचं काटेकोर पालन केलं गेलं तर जसा चंदू परत आला तशीच भारतीय वैमानिक परत येण्याची आशा आपण करु शकतो.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी जम्मू काश्मीरच्या भागात घुसखोरी करुन बॉम्ब हल्ले केले. पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानाला भारतीय वायुसेनेनं नौशेराच्या लाम वॅलीमध्ये पाडलं, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
भारतीय वायुसेनेनं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईदरम्यान भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या कारवाईत वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
संबंधित बातम्या
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती
भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, बडगाममधील चॉपर पाडलं नसल्याची कुबली
पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही
डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं
...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं