मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांच्या समर्थकांना चेव येऊन त्यांनी आपलाच नेता मंत्री होणार म्हणून गल्लो-गल्ली फ्लेक्सबाजी सुरु केलीय.
मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार असल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्रीपदाचे (Chief minister) नाव जाहीर न झाल्याने महाराष्ट्राच मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्यातील सरकार स्थापनेला वेळ लागत असल्याने नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे कोणाला मिळणार याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे, निवडून आलेल्या आमदारांचे समर्थक आपलाच नेता मंत्री, मुख्यमंत्री बनणार असल्याचे फ्लेक्स मतदारसंघात लावत आहेत. एवढंच नाही तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) मुख्यमंत्री बनणार असल्याची पोस्ट देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र, यामुळे या नेत्यांना फायदा होण्याऐवजी त्यांची अडचणच होत असल्याचे पाहायला मिळालं. मुरलीधर मोहोळ यांना तर स्वतः सोशल मिडीयावर यांचा खुलासा करावा लागला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांच्या समर्थकांना चेव येऊन त्यांनी आपलाच नेता मंत्री होणार म्हणून गल्लो-गल्ली फ्लेक्सबाजी सुरु केलीय. काहींनी तर आपल्या नेत्याला कुठल्या खात्याचे मंत्रीमद मिळणार हे देखील जाहीर करुन टाकलय. मात्र, कार्यकर्ते घोड्यावर बसलेले असले तरी आपण उतावीळ होऊन चालणार नाही, हे त्यांच्या नेत्यांना चांगलंच ठावूक आहे. त्यामुळे मंत्रिपदाची स्वप्नं पाहणारे हे आमदार जाहीरपणे बोलण्याचं टाळत आहेत. मुंबईत आणि काहींचं दिल्लीत त्यासाठी लॉबींग सुरु आहे. या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र राज्य सरकारचा शपथविधी होण्याआधीच मंत्रीपदे जाहीर करून टाकलय . विशेष म्हणजे सर्वांत कहर केला तो केंद्रीय सहकारमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांनी. मुरलीधर मोहोळ त्यांच्या खात्याच्या कामाच्या निमित्ताने खात्याचे कॅबीनेट मंत्री असलेले सहकार मंत्री अमित शाहा यांना भेटले आणि इकडे लागलीच त्यांच्या समर्थकांनी मुरली अण्णा मुख्यमंत्री बनणार असल्याचे मेसेजेस व्हायरल करायला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी यामुळे होणारी अडचण लक्षात आल्यावर मुरलीधर मोहोळ यांना ट्वीटर आणि फेसबुकवरुन खुलासा करावा लागला.
काळजीवाहू मुख्यमंत्री मूळगावी
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस झालेत. मात्र, सरकार स्थापन करण्याच्या बैठका अर्धवट सोडून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात निघून गेले आहेत. महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेला अद्याप मुहुर्त लागत नसला तरी विजयी झालेल्या आमदारांचे कार्यकर्ते सोशल मिडीया आणि फ्लेक्सवर आपापल्या नेत्यांना मंत्री करुन मोकळे होताना पाहायला मिळत आहे. जोपर्यंत महायुतीतील तिढा सुटत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांचे हे असे उमाळे सुरुच राहणार आहेत. त्यामुळे, आणखी 5 दिवस गावागावात आणि मतदारसंघात हे राजकीय मनोरंजन पाहायला मजा येणार आहे.
हेही वाचा
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर