ABP C Voter Survey: दोन हजारांच्या नोटा आणि आगामी निवडणुकांचा संबंध? लोकांना काय वाटतं? सर्वेक्षणातून समोर आली मोठी बाब
ABP C Voter Survey: एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने 2000 रुपयांवर होणाऱ्या बंदीच्या निर्णयावर सर्वेक्षण केले आहे. जाणून घेऊया यावर नागरिकांचे मत काय आहे.
ABP C Voter Survey: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ माजली. या निर्णयामुळे देशातील राजकिय वातावरण देखील चांगलेच तापले. विरोधकांनी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होण्याला मोदी सरकारचे अपयश म्हटले आहे. परंतु भाजपाने मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान नागरिकांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने सर्वेक्षण (C Voter Survey) केलं आहे.
या सर्वेक्षणात 2000 नोटांवर घालण्यात आलेल्या बंदीचा आगामी निवडणुकांशी काही संबंध आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर आश्चर्यकारक उत्तरं मिळाली आहेत. या सर्वेक्षणात 45 टक्के लोकांनी म्हटले की हो दोन हजारांच्या नोटा बंद होण्यामागे आगामी निवडणुकांचा संबंध असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं. तर 34 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की असं काहीच नाही. 21 टक्के लोकांनी म्हटले की ते याबाबत नश्चित काही सांगू शकणार नाहीत.
दोन हजाराच्या नोटा बंद होण्यामागे आगामी निवडणुकांचा काही संबंध आहे का?
हो - 45 टक्के
नाही - 34 टक्के
सांगू शकत नाही - 21 टक्के
या सर्वेक्षणात आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता. दोन हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर हजार रुपयांच्या नोटा पुन्हा येणार का? यावर देखील तितकीच आश्चर्यकारक उत्तरं मिळाली आहेत. 66 टक्के लोकांचं म्हणणं आहे की हो दोन हजारांच्या नोटांनंतर पुन्हा हजारांच्या नोटा सुरु होतील. तर 22 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 12 टक्के लोकांनी काही सांगू शकत नाही असं म्हटलं.
दोन हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर हजार रुपयांच्या नोटा पुन्हा येणार का?
हो - 66 टक्के
नाही - 22 टक्के
सांगू शकत नाही - 12 टक्के
(टीप - एबीपी न्यूजसाठी हा सर्वे सी-वोटरने केला आहे. सर्वेक्षणातील सगळी मतं ही लोकांशी केलेल्या चर्चेवर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. यासाठी एबीपी न्यूज जबाबदार नाही)