BJP New President : भाजप प्रदेशाध्यक्षांपासून ते पदाधिकारी दिल्लीत पोहोचले; देवेंद्र फडणवीसांना गुड न्यूज मिळणार?
BJP New Presindent : जेपी नड्डा जून 2019 मध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष बनले. यानंतर त्यांना 20 जानेवारी 2020 रोजी पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला होता.
![BJP New President : भाजप प्रदेशाध्यक्षांपासून ते पदाधिकारी दिल्लीत पोहोचले; देवेंद्र फडणवीसांना गुड न्यूज मिळणार? buzz over BJP New President BJP top leadership will hold a meeting with state presidents and general secretaries from across the country BJP New President : भाजप प्रदेशाध्यक्षांपासून ते पदाधिकारी दिल्लीत पोहोचले; देवेंद्र फडणवीसांना गुड न्यूज मिळणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/17/1a32cd366c7e4676ff6c747cd3af33051723874567756736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BJP New Presindent : भाजपने (BJP) आज (17 ऑगस्ट) दिल्लीत मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह सर्व प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे नेतृत्व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा करणार आहेत. या बैठकीत भाजप सदस्यत्व अभियानावरही चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पक्षाध्यक्ष (BJP New Presindent) निवडीपूर्वी ही मोहीम पूर्ण करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. या बैठकीला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांशिवाय विविध राज्यांतील पक्ष संघटनेचे प्रभारी सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.
11 ऑगस्ट रोजी राजनाथ सिंह यांच्या घरी भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांची बैठक झाली. तत्पूर्वी, 11 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा दिल्लीतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या घरी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेत्यांची बैठक झाली. तब्बल 5 तास चाललेल्या या बैठकीत भाजपच्या नूतन अध्यक्षांबाबत विचारमंथन झाले. या बैठकीत राजनाथ यांच्याशिवाय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे आणि आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार उपस्थित होते.
नड्डा केंद्रात मंत्री झाल्यामुळे अध्यक्ष बदलणार
जेपी नड्डा जून 2019 मध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष बनले. यानंतर त्यांना 20 जानेवारी 2020 रोजी पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना केंद्र सरकारमध्ये आरोग्यमंत्री करण्यात आले. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पदाची सत्ता आहे. त्यामुळे नड्डा यांना अध्यक्षपद सोडावे लागले आहे.
भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया
भारतीय जनता पक्षात (भाजप) अध्यक्ष निवडीसाठी पक्षाच्या घटनेत स्पष्ट सूचना आहेत. पक्षाच्या घटनेतील कलम 19 अन्वये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची व्यवस्था करण्यात आली आहे. कलम 19 नुसार पक्षाच्या अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजियद्वारे केली जाईल. त्यात राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदांचे सदस्य असतील. ही निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणीने ठरवून दिलेल्या नियमांनुसार घेतली जाईल, असे पक्षाच्या घटनेत नमूद केले आहे. अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी, व्यक्ती किमान 15 वर्षे पक्षाची प्राथमिक सदस्य असणे आवश्यक आहे. कलम 19 च्या पानावरच असे लिहिले आहे की, निवडणूक मंडळातील एकूण 20 सदस्य राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी पात्र असलेल्या व्यक्तीचे नाव सुचवतील.
हा संयुक्त प्रस्ताव किमान 5 राज्यांमधून आला पाहिजे जिथे राष्ट्रीय परिषद निवडणुका झाल्या आहेत. याशिवाय अशा निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रावरील उमेदवाराची मान्यताही आवश्यक असते. भाजपच्या घटनेनुसार, किमान 50 टक्के म्हणजे अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाऊ शकतो. या अर्थाने देशातील 29 पैकी 15 राज्यांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड संघटनेच्या निवडणुकीनंतरच होते.
देवेंद्र फडणवीस भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभे असलेले भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या कारणाने महाराष्ट्रात चर्चेत आहेत. फडणवीस केंद्रीय राजकारणात जाऊन भाजपचे नवे अध्यक्ष होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चेला वेग आला होता.
फडणवीस यांना संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. या सगळ्यात त्यांच्या 'हर हर महादेव' ची जाहिरात महाराष्ट्रातील काही वृत्तपत्रात छापून आल्यावर ते राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मार्गावर जात असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील की नाही यापेक्षा मोठा प्रश्न हा आहे की ते केंद्रात गेले तर महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व कोण करणार? महाराष्ट्रातील यावेळची निवडणूक अत्यंत गुंतागुंतीची मानली जात आहे.
फडणवीसांवर भाजपची भिस्त
महाराष्ट्रात भाजप पूर्णपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर अवलंबून आहे. पक्षाचे इतर नेते फडणवीस यांच्याएवढ्या उंचीचे नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट फडणवीसांनाच टार्गेट केलं आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजात फडणवीस यांच्याविरोधात नाराजी आहे. भाजपने त्यांना केंद्रात घेतले तर फडणवीसांच्या जागी येणाऱ्या नेत्याला तयारीला गती देण्यासाठी फारच कमी वेळ मिळेल, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. फडणवीस अध्यक्ष झाल्यास विनोद तावडे राज्यात परतणार का? अशीही चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)