BP, वजन, तापमान ते ECG, उत्तर प्रदेशातील ATM अवघ्या पाच मिनिटात सांगणार 20 आजार
Health ATMs: प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी यूपीमधील ग्रामीण आणि उपनगरी भागात 4,000 हून अधिक आरोग्य एटीएम किंवा आरोग्य पॉड्स स्थापित केले जातील.
लखनौ : एटीएममध्ये ज्या पद्धतीने काही सेकंदात पैसे उपलब्ध होतात त्याच प्रमाणे इतरही सेवा मिळाल्या तर? एटीएमच्या माध्यमातून केवळ पाच मिनिटात तुमच्या आरोग्यविषयक 20 समस्या समजल्या तर? काय म्हणता... हे कसं शक्य आहे? उत्तर प्रदेशात लवकरच ही गोष्ट शक्य होणार असून केवळ पाच मिनिटात कोणाच्याही आरोग्याशी संबंधित 20 पॅरामिटरची डिटेल माहिती मिळणार आहे. राज्यातील प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अशा 4,000 हून अधिक आरोग्य एटीएम किंवा आरोग्य पॉड्स ग्रामीण आणि उपनगरी भागात बसवण्यात येणार आहेत. नुकत्याच संपलेल्या उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये (Uttar Pradesh Global Investors' Summit), सरकारने राज्यातील 4,600 सामुदायिक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर असे आरोग्य एटीएम बसवण्यासाठी इंडिया हेल्थ लिंकसोबत (India Health Link) सामंजस्य करार केला.
इंडिया हेल्थ लिंक (IHL) चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. स्वदीप श्रीवास्तव यांनी सांगितले की, हेल्थ एटीएमच्या माध्यमातून भारतातील प्राथमिक आरोग्य सेवेतील पायाभूत सुविधांमध्ये जो गॅप राहिला आहे तो भरुन निघेल. आपल्या देशात बहुतांश ठिकाणी डायग्नोस्टिक सेंटर्सचा अभाव असल्याने लोकांना कित्येक किलोमीटर चालत जावं लागतं आणि जिल्हा रुग्णालयात वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. यासाठी अनेकदा एक-दोन दिवसही जातात. प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही अनेक वेळा डॉक्टर उपलब्ध नसतात आणि उपकरणांची कमतरता असते. अशा ठिकाणी या एटीएममुळे लोकांना दिलासा मिळेल.
यूपीच्या 4,600 उपकेंद्रांमध्ये अशा प्रकारचं हेल्थ एटीएम बसवण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक तालुक्यामध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सुरुवातीला हेल्थ एटीएम 100 ब्लॉक्समध्ये बसवण्यात येतील. ग्रामीण भागात सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा मूळ उद्देश त्यामागे आहे.
Health ATMs: हेल्थ एटीएम कसं काम करतं?
बँकेच्या एटीएमप्रमाणे, हेल्थ पॉड हे एक स्वयंचलित टच-स्क्रीन किओस्क आहे जे एखाद्याला केवळ पाच मिनिटात रक्तदाब, शरीराचे वजन, शरीराचे तापमान, सिक्स लीड ईसीजी, ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हलसह 20 गोष्टी तपासून देते. त्यानंतर रुग्णांना तपासणीचा रिपोर्ट त्वरित प्रिंटआउट, व्हॉट्सअॅप, ई-मेल आणि एसएमएसद्वारे उपलब्ध करुन दिले जातात.
अशा एटीएममुळे बाह्यरुग्ण विभागाचा (ओपीडी) भार कमी होईल आणि बेसिक गोष्टींचा सर्व डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.
हे एटीएम मेड-इन-इंडिया डिव्हाइस असून ज्याची किंमत सुमारे 4-5 लाख रुपये आहे. सध्या आंध्र प्रदेश मेड टेक झोनमध्ये याची निर्मिती केली जात आहे.
अचूकता दर 97 टक्क्याहून अधिक
चेन्नईतील डॉ. मेहता यांच्या हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपासून याची चाचणी सुरु असून सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे एक चाचणी करण्यात आली आहे. आरोग्य एटीएममधील अहवाल स्वतंत्रपणे वैद्यकीय-श्रेणीच्या उपकरणांसह प्रमाणित केला आहे आणि याचा अचूकता दर 97 टक्क्यांहून अधिक आढळला आहे.
भारतात आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली जात नसल्याचं अनेक अहवालातून स्पष्ट दिसून आलं आहे. 25-50 वयोगटातील लोकसंख्येपैकी 75 टक्के लोक कधीच आरोग्य चाचण्यांसाठी जात नाहीत. त्यामुळेच ते हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना कारणीभूत ठरणारी सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित होतात असं मेडिकल अहवालात म्हटलं आहे.
ही बातमी वाचा: