Blue Lake : 'या' तलावातील पाणी काचेसारखं, पण स्पर्श करायला बंदी, काय आहे कारण?
Blue Lake : 2011 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड अॅटमॉस्फेरिक रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी ब्लू लेकचे वर्णन पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत म्हणून केले आहे
Blue Lake : निसर्गात अशा खूप गोष्टी आहेत, ज्या एकदा पाहिल्यानंतर देखील मन भरत नाही. त्या गोष्टी सतत पाहातच राहावं वाटतं. पर्वत असो, सूर्योदयाचे सुंदर दृश्य असो किंवा सूर्यास्त असो, अशा ठिकाणांना पुन्हा पुन्हा भेट द्यायला सर्वांनाच आवडेल. न्यूझीलंडमध्ये देखील असेच एक सरोवर आहे, ज्याला ब्लू लेक म्हणतात. या ब्लू लेक एकदा पाहिल्यानंतर तो सतत पाहावा वाटतो. त्याचं कारणही तसंत आहे. या सरोवराचं पाणी इतकं स्वच्छ आहे की ते पाणी आहे की काच आहे हेच लवकर समजत नाही.
तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुमच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी न्यूझीलंड हा एक उत्तम पर्याय आहे. 'ब्लू लेक' हे येथील नैसर्गिक स्थळांपैकी एक आहे, ते दक्षिण आल्प्सच्या उत्तरेकडील भागात नेल्सन लेक्स नॅशनल पार्कमध्ये आहे. या तलावाला अधिकृतपणे जगातील सर्वात स्वच्छ तलावाचा दर्जाही आहे.
Blue Lake : तळाशी पडलेले खडे आणि दगड देखील स्पष्टपणे दिसतात
2011 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड अॅटमॉस्फेरिक रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी ब्लू लेकचे वर्णन पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत म्हणून केले आहे. अभ्यासानुसार, 70 ते 80 मीटर अंतरावरूनही तुम्हाला या तलावाच्या आतील दृश्य अगदी स्पष्टपणे पाहता येईल. असे म्हणतात की, तलावाच्या तळाशी पडलेले छोटे खडे देखील स्पष्टपणे दिसतात. ब्लू लेकने गोल्डन बे मधील स्वच्छ पाण्याच्या तलाव ते वायकोरोपुपु स्प्रिंग्सला देखील मागे टाकले आहे. या तलावाची दृश्यता केवळ 63 मीटरपर्यंत आहे.
Blue Lake : पाण्याला स्पर्श करण्यासही बंदी
येथील स्थानिक माओरी लोक या तलावाला पवित्र मानतात. हे लोक या तलावाला Rotomairewhenua म्हणतात, ज्याचा इंग्रजीत अर्थ शांततापूर्ण पाण्याची जमीन असा आहे. या तलावात कोणालाही पोहण्याची परवानगी नाही. हा तलाव पवित्र मानला जात असल्याने त्याला स्पर्श करणे देखील निषिद्ध आहे. 2021 मध्ये नेल्सन नॅशनल पार्कच्या काही तलावांमध्ये डायटॉमिक शैवाळ आढळून आले जे पाणी दूषित करते. तेव्हापासून ही बंदी आणखीनच आवश्यक बनली आहे. त्यामुळे संवर्धन विभागाने 2022 मध्ये निळ्या तलावाचे दूषित होण्यापासून संरक्षण करण्यासाठी येथे वॉर्डनही तैनात केले आहेत.
महत्वाच्या बातम्या