(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटकात सत्तापालटाची शक्यता, मुंबईतून हालचाली
मुंबईतील एका प्रभावशाली भाजपा नेत्यावर काँग्रेस आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या नेत्याने कर्नाटकातील 10 काँग्रेस आमदारांची सोय मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे.
मुंबई : कर्नाटकात 16 जानेवारीनंतर कधीही सत्तापालट होण्याची शक्यता आहे. जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणून भाजपचं सरकार सत्तेवर आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी पूर्ण केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी म्हणजे शेजारी कर्नाटकातील सत्तापालटाचं केंद्र आपल्या मुंबईत आहे.
मुंबईतील एका प्रभावशाली भाजपा नेत्यावर काँग्रेस आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या नेत्याने कर्नाटकातील 10 काँग्रेस आमदारांची सोय मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. कर्नाटकातील आणखी काही काँग्रेस आमदारांची भाजपशी सौदेबाजी सुरु आहे. आणखी चार काँग्रेस आमदार भाजपाच्या समर्थनार्थ सरसावण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आमदारांची पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली जात असतानाच कुणीही त्यांच्यापर्यंत पोहचू नये यासाठी काँग्रेस आमदारांच्या संरक्षणासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं. यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदार आहेत. या संख्याबळावर जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
मात्र त्याआधी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. भाजपने 104 आमदारांच्या जोरावर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच येडीयुरप्पा यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली होती.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 37
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1