राम मंदिर कधी बनणार? केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार वी के सिंह यांनी दिलं उत्तर
राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपने गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वापर केला आहे. या निवडणुकीतही अपेक्षेनुसार राम मंदिर निर्मितीचं आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.
गाझियाबाद : अयोध्येत राम मंदिर कधी बनणार हा सर्वात मोठा प्रश्न आज सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय मंत्री आणि गाझियाबादमधील भाजपचे लोकसभेचे उमेदवार वी.के. सिंह यांनी दिलं आहे. प्रभू रामाची इच्छा असेल, तेव्हाच अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण होईल, असं वी के सिंह यांनी म्हटलं आहे.
गाझियाबादमध्ये वी के सिंह मतदान करण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी म्हटलं की, "रामलला त्यांची इच्छा होती त्यावेळी प्रकट झाले होते. त्यामुळे त्यांचं मंदिरही तेव्हाच बनेल जेव्हा त्यांची इच्छा असेल." तसेच गेल्या पाच वर्षात भाजपने केलेल्या विकास कामांवर लोक त्यांना मतदान करतील असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला.
एकीकडे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अशी प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे भाजपने आपल्या संकल्पपत्रात राम मंदिर निर्मितीचा संकल्प केला आहे.
राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपने गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वापर केला आहे. या निवडणुकीतही अपेक्षेनुसार राम मंदिर निर्मितीचं आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. मात्र भाजपचे मंत्री जर असं वक्तव्य करत आहेत, तर राम मंदिराचं आश्वासन जुमला तर नाही अशी शंका सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.
VIDEO | राजकीय पक्ष आचारसंहिता जुमानत नाहीत? | माझा विशेष