भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, राज्यातून पियूष गोयल आणि अनिल बोंडेंना संधी
भाजपने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भाजपकडून राज्यसभेसाठी दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि जगेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे. राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे.
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति ने विभिन्न राज्यों में होने वाले आगामी राज्य सभा द्विवार्षिक चुनाव 2022 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/LUBrhkXGHN
— BJP (@BJP4India) May 29, 2022
देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.
कार्यकाल संपत असलेल्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल यांचा कार्यकाळही संपत आहे. त्याचबरोबर बसपचे सतीश चंद्र मिश्रा यांचा कार्यकाळही संपत आहे. पंजाबमधील एकमेव अकाली दलाचे राज्यसभा सदस्य बलविंदर सिंग भूंदर आणि काँग्रेसच्या अंबिका सोनी यांचाही कार्यकाळ संपणार आहे.
उत्तर प्रदेशातील 11 राज्यसभा खासदार जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. या खासदारांमध्ये भाजपचे 5, समाजवादी पक्षाचे 3, बसपाचे 2 आणि काँग्रेसचा 1 सदस्य आहे. तसेच बिहारमधून 5 राज्यसभा सदस्य जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. ज्यामध्ये आरजेडीच्या मीसा भारती, भाजप नेते सतीश चंद दुबे आणि गोपाल नारायण सिंह यांचा समावेश आहे. तर जेडीयूचे रामचंद्र मिश्र यांचा समावेश आहे. याशिवाय दुसरी जागा शरद यादव यांच्याकडे होती.
हे ही वाचलं का ?