ऐकावं ते नवलंच! चक्क 2 किलोमीटरची रेल्वे पटरी चोरीला, चोरांचा प्रताप पाहून डोक्याला हात लावाल...
Bihar : कार, बस किंवा ट्रक चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण बिहारमधील (Bihar) चोरांची गोष्टच वेगळी आहे.
Railway Track Stolen In Bihar : कार, बस किंवा ट्रक चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण बिहारमधील (Bihar) चोरांची गोष्टच वेगळी आहे. बिहारमधील चोरट्यांनी आतापर्यंत रेल्वेचे इंजिन, मोबाईल टॉवर अन् रेल्वे इंजिनची (Railway Engine) चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. पण आता बिहारमधील चोरट्यांनी चक्क रेल्वे पटरी चोरण्याचा प्रताप केलाय. एक दोन नव्हे तर दहा दिवसानंतर ही चोरी उजेडात आली. याप्रकरणी रेल्वेनं कारवाई केली असून दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. बिहारमधील समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनअंतर्गत ही चोरी झाली आहे.
बिहारमधील समस्तीपूर रेल्ले डिव्हिजनअंतर्गत चोरट्यांनी दोन किलोमीटर रेल्वेची पटरी चोरली. समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनकडून टेंडर न काढता कोट्यवधी रुपयांचं स्क्रॅप विकलं जात आहे. याप्रकरणी आरपीएफ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रेल्वेनं दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलेय. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. रेल्वेला मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित करम्यात आलेले दोन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांची नावे श्रीनिवास आणि मुकेश कुमार सिंह अशी आहेत.
समस्तीपूर रेल्वे डिव्हिजनच्या माहितीनुसार, लोहट चीनी मिल (Lohat Chini Mill) साठी पंडोल रेल्वे स्टेशनपासून रेल्वे पटरी टाकण्यात आली आहे. चीनी मिल स्टेशन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. स्टेशन बंद असल्यामुळे तिकडे येणारी रेल्वे लाइनही बंद होती.. त्यावरुन कोणतीही रेल्वे धावत नव्हती.. अशातच रेल्वेचं स्क्रॅप चुकीच्या पद्धतीनं विकलं जात असल्याचं समोर आले.. 24 जानेवारी रोजी हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर रेल्वेनं तातडीनं कारवाई करत आरपीएफ अधिकाऱ्यासह दोन जणांना निलंबित केलं. त्यासह याबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यासाठी एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
रेल्वे डिव्हिजनच्या माहितीनुसार, आरपीएफ अधिकाऱ्याच्या परवानगीनं टेंडरशिवाय रेल्वे स्क्रॅप विकलं जात होतं. यातील काही स्क्रॅप ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी दरभंगा आरपीएफ स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी बिहारमध्ये रेल्वे इंजिन चोरून विकलं होतं -
बिहारमध्ये (Bihar) चोरट्यांनी याआधी रेल्वेचे इंजिन (Railway Engine) चोरलं होतं. एवढेचं नाही तर चोरट्यांनी रेल्वेचे ते इंजिनही विकलं होतं. मुझफ्फरपूर रेल्वे पोलिसांच्या छाप्यात ही बाब उघड झाली होती. मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून इंजिनच्या भागांची 13 पोती जप्त करण्यात आली होती. चौकशीदरम्यान आरोपींनी बोगदा खोदून ही घटना घडवून आणल्याचे निष्पन्न झाले होती. रोहतास येथील 500 टन वजनाच्या पुलाच्या चोरीनंतरची ही दुसरी मोठी घटना होय.