Bangalore Rain : कर्नाटकात पावसाचा हाहाकार, 90 वर्षाचा विक्रम मोडला, बंगळुरुमध्ये जनजीवन विस्कळीत
कर्नाटक (Karnataka) राज्यात मुसळधार पावसानं कहर केला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसानं गेल्या 90 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Bangalore Rain : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यात देखील मुसळधार पावसानं कहर केला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसानं गेल्या 90 वर्षांचा विक्रम मोडला आहे. या पावसामुळं कर्नाटकातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. विशेषत:आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरुमध्ये (Bangalore) पावसामुळं परिस्थिती गंभीर झाली आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बंगळुरुमधील ड्रेनेज मार्गांवर अतिक्रमण झाल्यामुळं रस्त्यांवर पाणी आल्याचे बोलले जात आहे.
घरांमध्येही शिरलं पुराचं पाणी
कर्नाटकात सध्या पावसानं हाहाकार घातला आहे. गेल्या 90 वर्षाचा पावसाचा विक्रम त्याठिकाणी मोडला आहे. या मुसळधार पावसामुळं रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून घरांमध्येही देखील पाणी शिरलं आहे. सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झालं आहे. रस्त्यांवर पुराचं पाणी साचल्यानं शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना घरुन काम करावे लागत आहे.
गेल्या सहा दिवसात बंगळुरुमध्ये 215 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद
दरम्यान, गेल्या सहा दिवसात बंगळुरुमध्ये 215 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच 30 दिवसांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशाराही दिला आहे. अशा स्थितीत रस्त्यावर आधीच तुंबलेल्या पाण्यामुळं नागरिक चिंतेत आहेत. जर आणखी पाऊस झाला तर परिस्थिती अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाल्यांच्या मार्गावर 600 अतिक्रमणे झाली आहेत. यामुळं पुराचं पाणी रस्त्यांवर आल्याची माहिती मिळते आहे.
अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरु
पहिल्यांदाच बंगळुरुमध्ये महापालिकेने रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरु केली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केल्याची माहिती बीबीएमपीचे आयुक्त गिरीनाथ तुषार यांनी दिली. आतापर्यंत 64 अतिक्रमणे पाडण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. बंगळुरूमध्ये राजकारणी आणि बिल्डरांच्या संगनमताने अतिक्रमण सुरू झाले. गेल्या दोन दशकांपासून याठिकाणी आयटी उद्योग उभारुन सर्व सुविधा देऊन अतिक्रमण केले जात आहे. ज्या ठिकाणी पाणी वाहून जायचे त्या ठिकाणी आता मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. परिणामी, थोडा पाऊस पडताच, रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. कारण पाण्याचा निचरा होण्यास मार्ग मिळत नाही. अशा परिस्थितीत रस्त्यांवर पाणी साचते. त्यामुळं आता प्रशासन ड्रेनेज मार्गांवर बांधलेल्या 600 इमारतींवर कारवाई करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: