Asaduddin Owaisi : मोदी म्हणतात, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? ओवैसींचा सरकारला सवाल
Asaduddin Owaisi Counters Modi Government : पाकिस्तानातून दहशतवादी येऊन आमच्या लोकांना मारतात आणि आपण त्याच देशाशी क्रिकेट खेळतो? असा प्रश्न विचारत ओवैसींनी सरकारवर टीका केली.

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असून विरोधकांनी मोदी सरकारला अनेक मुद्द्यांवरुन कात्रीत पकडलं आहे. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आधी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणत सिंधू करार रद्द केला, तर मग पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता असा प्रश्न त्यांनी विचारला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्याची घोषणा केली. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं वक्तव्य त्यावेळी पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याचाच संदर्भ घेऊन खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
व्यापार बंद, पाणी रोखलं, मग क्रिकेट का सुरू?
ओवैसी म्हणाले, “पाकिस्तानातून दहशतवादी येऊन आमच्या लोकांना मारतात आणि आपण त्याच देशाशी क्रिकेट खेळतो? असा क्रिकेटचा सामना पाहण्याची परवानगी माझा आत्मा मला देत नाही. तुम्ही पाकिस्तानसोबत व्यापार बंद केलात, त्यांच्या बोटी भारतीय पाण्यात येऊ शकत नाहीत. मग खेळात मैत्री कुठून आली?”
बैसरन घाटीमधील हत्या,जबाबदारी कोणाची?
सीमेपलीकडून आलेल्या चौघांनी आमच्या नागरिकांना मारलं, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न विचारत ओवैसींनी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव अधोरेखित केला.
सीजफायरचा निर्णय व्हाईट हाउसमधून का?
पाकिस्तानचा सेनाध्यक्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासोबत जेवत होता. त्याच्या भाषणानंतर आपले नागरिक मारले गेले. ही परराष्ट्र धोरणाची सफलता असेल तर ती लाजीरवाणी गोष्ट आहे, अशी टीका ओवैसींनी केली. आपला राष्ट्रीय अभिमान इतका दुर्बल आहे का की अमेरिका सीजफायर जाहीर करेल आणि आपण मान्य करू? असं म्हणत ओवैसी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
चीनला प्रश्न का नाही विचारला?
भारताने कधी चीनला विचारले का की तो पाकिस्तानला शस्त्रास्त्रे का पुरवतो? असा रोखठोक सवाल करत ओवैसींनी भारताच्या जागतिक धोरणांवर चिंता व्यक्त केली.
सरकारवर अंतिम इशारा
खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “राष्ट्रीय सुरक्षेवर आणि परराष्ट्र धोरणावर राजकारण करू नका. गलवान संघर्षात आपण अमेरिकेच्या मध्यस्थतेला नकार दिला. पण भारत आणि पाकिस्तानच्या वादात आज ट्रम्प सर्वप्रथम प्रतिक्रिया देतात. ही आपली राजनितीक दुर्बलता नाही का?”
संपूर्ण भाषणातून ओवैसींनी सरकारला पाकिस्तान, अमेरिका, चीन आणि देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर आक्रमक प्रश्न विचारले, आणि परराष्ट्र धोरणातील विरोधाभास अधोरेखित केला.
ही बातमी वाचा:























