फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने हत्तीणीचा मृत्यू; गुन्हेगारांना शोधण्याची अनुष्का शर्माची केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती
केरळमध्ये फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने एका गर्भवती हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले आहे. घटनेची माहिती मिळताच सोशल मीडियावर घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे, तसेच गुन्हेगारांना शिक्षेची मागणीही केली जात आहे. अनुष्का शर्मानेही सोशल मीडियावर गुन्हेगारांना पकडण्याची आणि शिक्षेची विनंती केरळच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे.
मुंबई : केरळमध्ये एका भुकेल्या गर्भवती हत्तीणीचा फटक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. या फटाक्यांच्या स्फोटानंतर या हत्तीणीला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे हत्तीणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या अमानवीय घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मानेही याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्का शर्माने टेड द स्टोनर या पेजवरचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं की, आम्ही सर्व केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या घटनेला जबाबदार गुन्हेगारांना शोधून या क्रुरकृत्याबद्दल त्यांना कडक शिक्षा द्या.
एका वन अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टनंतर हा सगळा प्रकार उजेडात आला. या वन अधिकाऱ्यांच्या फेसबूक पोस्टनंतर सोशल मीडियावर लोक आपला राग व्यक्त करत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्या अटकेची मागणी आता केली जात आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे घटना?
केरळमधील मलप्पुपरम येथील वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी एक पोस्ट आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी लिहिला होता. मोहन कृष्णन यांच्या पोस्टनुसार, एक भुकेली गर्भवती हत्तीण अन्नाच्या शोधात जंगलाजवळील एका गावात गेली होती. अन्नासाठी इथेतिथे ती फिरत होती. त्यानंतर काही अज्ञात लोकांनी फटाक्यांनी भरलेली अननस तिला खायला दिलं.
मोहन कृष्णन पुढे लिहितात, या फटाक्यांच्या स्फोटामुळे ही हत्तीण जखमी झाली. फटक्यांच्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की हत्तीणीच्या तोंड आणि जीभेला गंभीर इजा झाली. भूक लागली म्हणून जंगल सोडून मानवी वस्तीत आलेल्या हत्तीणीला माणसांनी पुन्हा अन्न खाण्याजोगंही नाही ठेवलं. एवढी गंभीर जखमी झालेली असतानाही या हत्तीणीने कुणालाही इजा पोहोचवली नाही. कुणावरही हल्ला न करता ती परतली.
गर्भवती असल्याने अन्नाच्या शोधात हत्तीण वेल्लियार नदीपर्यंत पोहोचली. त्यानंतर पाण्यात जाऊन उभी राहिली. तोंडावरील जखमेवर पाणी मारल्यानंतर हत्तीणीला थोडं बरं वाटलं. हत्तीणीच्या स्थितीची माहिती मिळताच वन अधिकारी दोन हत्तींना घेऊन नदीवर पोहोचले. दोन हत्तींच्या मदतीने या हत्तीणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. काही तासांच्या प्रयत्नानंतर हत्तीणीला पाण्याच्या बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हत्तीणीचा काही वेळातच मृत्यू झाला, असं मोहन कृष्णन यांनी सांगितलं.