जमिनीवर ढकललं, हँगरनं मारलं... लंडनमधील हॉटेलमध्ये एअर इंडियाच्या क्रू मेंबरला मारहाण
Air India Cabin Crew Case : एअर इंडियाच्या केबिन क्रूला लंडनमधील एका हॉटेलमध्ये मारहाण झाली आहे.
Air India Cabin Crew Case : नवी दिल्ली : एअर इंडियाच्या महिला क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन आणि मारहाणीचे प्रकरण समोर आलं आहे. लंडनमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये एअर इंडियाच्या महिला क्रू मेंबरसोबत गैरवर्तन करुन तिला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. एअरलाइननं रविवारी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ते स्थानिक पोलिसांच्या संपर्कात असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना लंडनच्या हिथ्रो येथील रेडिसन रेड हॉटेलमध्ये घडली. या हॉटेलमध्ये एअर इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय केली होती. दरम्यान, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधील सुरक्षेबाबत यापूर्वीही चिंता व्यक्त केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनच्या एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला क्रू मेंबर तिच्या खोलीत झोपली होती, तेव्हा 1.30 च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती तिच्या खोलीत घुसली. महिलेला कुणीतरी आपल्या खोलीत आल्याचा भास झाला आणि ती झोपेतून उठली. अज्ञात व्यक्तीला पाहून महिलेनं आरडाओरडा सुरू केला. यावर हल्लेखोरानं महिलेवर कपड्याच्या हॅन्गरनं हल्ला करून तिला जमिनीवर ओढलं. ती खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. पण तो तिला सतत मारहाण करत होता. अखेर आजूबाजूच्या खोलीतील लोक मदतीला आले आणि हल्लेखोर पकडला गेला. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
एअरलाईन्सनं काय म्हटलं?
एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, आम्ही या घटनेनं खरंच दुःखी आहोत. आम्ही आमचे सहकारी आणि टीमच्या संपर्कात आहोत. त्यांची सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. एअर इंडिया स्थानिक पोलिसांसोबत कायदेशीर मुद्द्यांवरही काम करत आहे. तसेच, हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितलं. विमान कंपनीनं म्हटलं आहे की, ती आपल्या क्रू मेंबर्स आणि स्टाफ सदस्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे.
दरम्यान, सध्या महिला क्रू मेंबर भारतात परतली असून तिचं समुपदेशन केलं जात आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एअर इंडियानं सुरक्षेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून केबिन क्रूला जाणीवपूर्वक धोक्यात आणलं.