(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agnipath Scheme Meeting: लष्कराच्या तिन्ही दलांची आज एकत्रित पत्रकार परिषद, काय घोषणा होणार याकडं सर्वाचं लक्ष
आज दिल्लीत लष्कराच्या तिन्ही दलांची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी ही पत्रकार परिषद होणार आहे.
Defence Minister Meeting : केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. विविध ठिकाणी हिंसक आंदोलन होत आहेत. या योजनेला वाढत जाणारा विरोध पाहता आज दिल्लीत लष्कराच्या तिन्ही दलांची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी ही पत्रकार परिषद होणार आहे. अग्निपथ योजनेला होणाऱ्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काय नवी घोषणा होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अजूनही लष्करप्रमुखासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अग्निपथ योजनेच्या संदर्भात चर्चा करत आहेत. आज लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव (DMA) लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख आज अग्निपथ योजनेवर पत्रकार परिषद घेणार आहेत. देशातील या योजनेला वाढता विरोध संपवण्यासाठी अग्निपथ योजना काही आकर्षक करणार का? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज सकाळी 10.15 वाजता अकबर रोड येथील निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही लष्करप्रमुखांसोबत बैठक घेतली. कालच्या बैठकीला लष्करप्रमुख उपस्थित नव्हते. त्यामुळं आज पुन्हा बैठक घेण्यात आली. काल हवाई दलाच्या कार्यक्रमासाठी लष्करप्रमुख हैदराबादला गेले होते. त्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र आजच्या बैठकीला उपस्थित आहेत.
अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण
काल झालेल्या बैठकीत अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नागरी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्ट गार्ड आणि डिफेन्स पीएसयूमध्येही 10 टक्के कोटा दिला जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार आहे
अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय वायुसेना 24 जूनपासून भरती मोहीम सुरु करणार आहे. त्यानंतर लवकरच भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी केली जाईल. लष्करातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयारी सुरु करावी, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तरुणांच्या भवितव्याबद्दलची काळजी आणि संवेदनशीलतेबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो असे सिंह म्हणाले. सैन्यात भरतीची प्रक्रिया काही दिवसांत सुरु होणार आहे. त्यांनी आपले काम सुरु करावे. त्यासाठी तयारी सुरु करावी असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. तरुणांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार सरकारने अग्निवीर भरतीची वयोमर्यादा यावेळी 21 वर्षावरुन 23 वर्षे केली आहे. यामुळे अनेक तरुण अग्निवीर योजनेसाठी पात्र होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: