Agneepath Scheme : अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेला सुरूवात, काय आहेत नियम आणि अटी?
Agneepath Scheme : अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्र सरकारकडून या भरतीसाठी नियम आणि अटी जाहीर करण्यात आल्या आहेत.
Agneepath Scheme : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी या योजनेविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. बिहारमध्ये तर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. परंतु, केंद्र सरकार अग्निपथ योजना राबवण्यावर ठाम आहे. आजपासून भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्र सरकारकडून या भरतीसाठी नियम आणि अटी जाहीर करण्यात आल्या आहेत. अग्निपथ योजनेतून भरती झालेल्या अग्निवीरांच्या नोकरीचा कालावधी चार वर्षांचा असेल. या योजनेतील अग्निवीर कोणत्याही प्रकारच्या पेन्शनसाठी पात्र असणार नाहीत.
मध्येच नोकरी सोडता येणार नाही
केंद्र सरकाने जाहीर केलेल्या नियम आणि अटींनुसार, भरती झालेल्या अग्निवीरांना त्यांच्या चार वर्षांच्या सेवेच्या कालावधीत मिळवलेली वर्गीकृत माहिती अधिकृत गुप्तता कायदा 1923 अंतर्गत कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा स्त्रोताकडे उघड करता येणार नाही. नियमित केडरमध्ये सैनिकांची नोंदणी वैद्यकीय शाखेतील तांत्रिक केडर वगळता भारतीय सैन्यात केवळ अग्निवीर म्हणून कामाचा कालावधी पूर्ण केलेल्या जवानांसाठीच उपलब्ध असेल. शिवाय अटी पूर्ण होण्यापूर्वी अग्निवीरला स्वतःच्या इच्छेने नोकरी सोडण्याची परवानगी नाही. परंतु, काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूरी दिल्यास या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना मध्येच नोकरी सोडता येईल.
अग्निपथ योजनेंतर्गत भरती करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जमीन, समुद्र किंवा हवाई दलामध्ये कुठेही नियुक्ती देण्यात येऊ शकते. सेवेच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर एक "विशिष्ट चिन्ह" असेल. प्रत्येक बॅचमध्ये त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना नियमित केडरमध्ये नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. "या अर्जांचा लष्कराद्वारे त्यांच्या कामाच्या कालावधीतील कामगिरीसह इतर निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल.
25 टक्के अग्निवीर सेवेत कायम होणार
अग्निवीरांच्या प्रत्येक बॅचमधील 25 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची चार वर्षांची नियुक्ती पूर्ण झाल्यानंतर नियमित केडरमध्ये नोंदणी केली जाईल. नियमित केलेल्या जवानांना आणखी 15 वर्षे सैन्यात सेवेची संधी मिळेल. हे कर्मचारी सध्या प्रचलित असलेल्या सेवा अटी आणि शर्ती (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर/इतर रँकच्या) द्वारे नियंत्रित केले जातील," अग्निवीरांना त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याना पुन्हा निवडण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. नावनोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून, प्रत्येक 'अग्नीवीर'ला 'अग्निपथ' योजनेच्या सर्व अटी व शर्ती औपचारिकपणे स्वीकारणे आवश्यक आहे.
वय आणि शिक्षण
अग्निपथ योजनेसाठी शैक्षणिक योग्यता 10वी किंवा 12वी पास आवश्यक आहे. या भरतीसाठी 17 वर्षे पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. परंतु, 18 वर्षांखालील कर्मचाऱ्यांसाठी नोंदणी फॉर्मवर पालकांची स्वाक्षरी आवश्यक असेल. नियमित सेवेत असलेल्यांसाठी 90 दिवसांच्या तुलनेत 'अग्निवीर' एका वर्षात 30 दिवसांच्या रजेसाठी पात्र असतील. वैद्यकीय सल्ल्यानुसार वैद्यकीय रजा मंजूर केली जाईल.
पुरस्कार...
सेवा कालावधीक अग्निवीरांचा विशेष कर्यासाठी सन्मान केला जाईल. शिवाय पुरस्कार देखील दिले जातील.
मानधन...
या योजनेअंतर्गत अग्निवीरांना पहिल्या वर्षी महिन्याला 30 हजार रुपये वेतन मिळेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन 33 हजार होईल. तिसऱ्या वर्षी हे मानधन प्रति महिना 36500 मिळेल. तर चौथ्या वर्षी यात वाढ होऊन महिना 40 हजार रुपये वेतन मिळेल.
निवृत्ती फंड
अग्निवीरांना देण्यात येणाऱ्या पगारातून 30 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या फंडमध्ये जमा केली जाईल. या फंडामध्ये सरकारकडून आणखी 30 टक्के रक्कम जमा केली जाईल. सेवा काळ संपल्यानंतर दहा लाख चार हजार रूपये फंडाची रक्कम आणि त्यावरील व्याज कर्मचाऱ्याला मिळेल. यासोबतच जीवन विमा संरक्षण अग्निवीरांना त्यांच्या सेवेच्या कालावधीसाठी 48 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळेल.
सेवा बजावत असताना मृत्यू झाला तर अग्निवीरांना योग्य मोबदला दिला जाईल. त्यासाठी केंद्र सरकाने काही नियम आणि अटी जारी केल्या आहेत. कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवानिधी त्यांना दिला जाईल.
सेवा पूर्ण झाल्यांतरचे लाभ
चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना ‘अग्नीवीर’ कौशल्य प्रमाणपत्र मिळेल. कालावधीच्या शेवटी अग्निवीरांना तपशीलवार कौशल्य संच प्रमाणपत्र दिले जाईल. अग्निवीरांनी आपल्या सेवा कालावधीत प्राप्त केलेली कौशल्ये आणि सक्षमतेचा या प्रमाणपत्रावर उल्लेख करण्यात येईल.