राज्यसभेतल्या आठ खासदारांच्या निलंबनावरुन उपोषणांचं युद्ध
राज्यसभेत कृषी विधेयकावरुन झालेल्या गदारोळानंतर आता उपोषण विरुद्ध उपोषण अशी लढाई सुरु झाली आहे. एकीकडे निलंबित झालेले खासदार काल रात्रभर संसदेच्या आवारात उपोषणाला बसले तर दुसरीकडे आता उपसभापती हरिवंश हे देखील एक दिवसांचं उपोषण करणार आहेत. अर्थात दरम्यानच्या काळात बरंच नाट्य घडलंय.
नवी दिल्ली : राज्यसभेत निलंबन झालेल्या आठ खासदारांनी अख्खी रात्र संसदेच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून काढली. जितका अभूतपूर्व राज्यसभेतला राडा होता तितकंच अभूतपूर्व हे आंदोलन होतं. अनेक खासदार दिवसभर या आंदोलकांना भेटून आपला पाठिंबा व्यक्त करत होते. पण सकाळी तर आणखी कमाल झाली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हेच स्वत: चहा-पोहे घेऊन या खासदारांना भेटण्यासाठी पोहोचले. अर्थात या खासदारांनी त्यांचा चहा नम्रपणे नाकारला. कारण विधेयक मागे घेत नाही तोवर आपला विरोध कायम ही त्यांची भूमिका आहे.
निलंबित खासदारांना चहाची ऑफर देऊन उपसभापती उपोषणाला
कृषी विधेयकावर राज्यसभेत जो अभूतपूर्व गोंधळ झाला, त्यानंतर या आठ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. विरोधकांनी उपसभापतींच्या एकतर्फी वागणुकीविरोधात अविश्वास प्रस्तावाचीही नोटीस दिली होती. पण सभापती व्यंकय्या नायडू यांनी ती फेटाळली. उर्वरित अधिवेशनसाठी निलंबित करण्यात आलेल्या या खासदारांनी मग संसदेच्या आवारात काल दुपारपासूनच हे आंदोलन सुरु केलं. रात्रभर हे खासदार याच पुतळ्याच्या आवारात बसून होते.
24 तास हे खासदार आपल्या जागेवरुन हलले नाहीत. निषेधाचे फलक हाती धरत सोबतीला स्फूर्तीगीतं गात त्यांनी आपला निषेध नोंदवला.
एक साथ लड़ना है pic.twitter.com/vUU4sxCvgr
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) September 22, 2020
निलंबित खासदारांच्या या आंदोलनानंतर आता उपसभापतीही एक दिवसांचं अन्नत्याग उपोषण करणार आहेत. खासदारांच्या या वर्तनाने आपण व्यथित झाल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय निवडणुका जवळ असल्याने त्यांच्या बिहारी असण्याचाही उल्लेख जोर देऊन होऊ लागला.
बिहार की धरती ने सदियों पहले पूरे विश्व को लोकतंत्र की शिक्षा दी थी।
आज उसी बिहार की धरती से प्रजातंत्र के प्रतिनिधि बने श्री हरिवंश जी ने जो किया, वह प्रत्येक लोकतंत्र प्रेमी को प्रेरित और आनंदित करने वाला है। — Narendra Modi (@narendramodi) September 22, 2020
एकीकडे दिल्लीत हा ड्रामा सुरु असताना तिकडे शरद पवारांनीही याच मुद्द्यावरुन एक दिवसांचं उपोषण जाहीर करुन टाकलं. कृषी विधेयकावरच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संभ्रम व्यक्त होत होता, त्या राष्ट्रवादीने हे संशयाचं धुकं दूर करण्याचा प्रयत्न केला. स्वत: शरद पवार यांनी या मुद्द्यावर पक्षाची भूमिका विरोधाचीच असल्याचं सांगितलं. शिवाय निलंबित खासदारांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपणही एक दिवसांचं अन्नत्याग उपोषण करणार असल्याचं जाहीर करुन टाकलं.
सदस्यांनी अन्नत्याग केला, आज दिवसभर मीही अन्नत्याग करणार : शरद पवार
खासदारांच्या या निलंबनानंतर आता काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे.
कृषी विधेयकावरुन सुरु झालेल्या या आंदोलनाची धग आता इथेच थांबणार नाही. काँग्रेस 2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या जयंतीला देशव्यापी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुढच्या काळात हे वादळ पेटण्याची शक्यता आहे.