Sanjay Singh : 'आप'च्या संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडीची रिमांड, खासदाराच्या घरात दोन कोटींचा व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा
Sanjay Singh Arrested In Liquor scam case : बुधवारी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आपचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती.
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह ((Sanjay Singh) यांना पाच दिवसांची ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली लिकर पॉलिसी (Liquor Scam Case )प्रकरणी सुनावणीदरम्यान ईडीने दहा दिवसांची रिमांड मागितली होती. मात्र त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे खासदार संजय सिंह आता 10 ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार असून यादरम्यान त्यांची चौकशी केली जाणार आहे.
अनेक तासांच्या चौकशीनंतर आपचे खासदार संजय सिंह यांना बुधवारी ईडीने त्यांच्या नॉर्थ अव्हेन्यू येथील शासकीय निवासस्थानी अटक केली होती. दिल्लीच्या मद्य धोरणात काही एजंट्सना फायदा मिळवून घेण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपचे खासदार संजय सिंह यांनी न्यायालयात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणुकीत पराभव होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मोदी सरकारने ईडीचा दुरूपयोग करत आपल्याला अटक केली आहे. संजय सिंह यांची बाजू मांडणारे अधिवक्ता मोहित माथूर म्हणाले की, ही अटक कोणत्या आधारावर करण्यात आली हे सांगितले पाहिजे.
ईडीचा दावा काय?
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात दोन वेगवेगळे व्यवहार झाल्याचा दावा ईडीच्या वकिलाने न्यायालयात केला. यामध्ये एकूण दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. दिनेश अरोरा यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फोनवरून व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या रिमांड पेपरमध्ये संजय सिह यांच्या घरी पैशांचा व्यवहार झाल्याचा उल्लेख आहे. पहिल्या हप्त्यात 1 कोटी आणि दुसऱ्या हप्त्यात 1 कोटी अशा दोन कोटी रुपयांचा व्यवहार संजय सिंह यांच्या घरी झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.
ईडीच्या रिमांड पेपरमध्ये इंडो स्पिरिटच्या माध्यमातून झालेल्या पैशांच्या व्यवहाराचाही उल्लेख करण्यात आला आहे. संजय सिंग यांचा कर्मचारी सर्वेश याला घरी पैसे देण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.
ईडीने सांगितले की, दिनेश अरोरा यांच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने संजय सिंह यांच्या घरी जावून त्यांना 2 कोटी रुपये दिले. याशिवाय संजय सिहं यांच्या घरासाठी इंडो स्पिरिटच्या कार्यालयाकडून एक कोटी रुपयेही देण्यात आले होते. सिंह यांच्या फोनमधूनही काही नंबर्स मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीने केलेला दावा हा खोटा असल्याचं खासदार संजय सिंह यांनी सांगितलं.
ही बातमी वाचा: