(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचं निलंबन
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव सातव, तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओ ब्रायन यांच्यासह आठ खासदारांचं एक आठवड्यासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांचं एक आठवड्यासाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.
कृषी विधेयकाच्या विरोधात विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रुल बुक फाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचं सात दिवसांसाठी निलंबन केलं.
'या' आठ खासदारांचं निलंबन संजय सिंह (आम आदमी पक्ष), राजीव सातव (काँग्रेस), डेरेक ओ ब्रायन (तृणमूल काँग्रेस), के के रगेश (माकप), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस) रिपुन बोरा (काँग्रेस) डोला सेन (तृणमूल काँग्रेस आणि एलामराम करीम (माकप) या खासदारांना निलंबित केलं आहे. उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे.
उपसभापतींविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला विरोधकांनी राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला होता, जो सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटळला.
शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (दुरुस्त) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाली होती. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक 2020 ही विधेयकं राज्यसभेत देखील मंजूर झाली. आज राज्यसभेत जीवनावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकांना देशभरातल्या शेतकरी संघटना याला विरोध करत आहेत.
संबंधित बातम्या
शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर, आज तिसरे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी
शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर, अभूतपूर्व गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज स्थगित