Durga Visarjan : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना; अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू, पाहा Video
West Bengal Flash Flood Accident : या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत,
West Bengal Flash Flood Accident : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) बुधवारी रात्री दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी (Jalpaiguri) येथील माल नदीत (Mal River) विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याशिवाय अनेक जण अजूनही नदीत अडकले आहेत. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य करत असल्याचे समजते. जलपाईगुडीचे एसपी देवर्षी दत्ता यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, 'अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत 7 मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आले आहेत, तर 10 जखमींनाही बाहेर काढण्यात आले आहे. जवळपासच्या लोकांनी सांगितले की, 30-40 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
#WATCH | WB: Flash flood hits Mal River in Jalpaiguri during Durga Visarjan; 7 people dead, several feared missing
— ANI (@ANI) October 5, 2022
Many people were trapped in river & many washed away. Bodies of 7 people were recovered. NDRF& civil defence deployed; rescue underway: Jalpaiguri SP Debarshi Dutta pic.twitter.com/cRT3nnp7Gz
7 जणांचे मृतदेह सापडले, 30-40 लोक अजूनही बेपत्ता
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला, तसेच पाण्यात वाहून गेलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. अपघातानंतर लगेचच जिल्हा प्रशासनाने विसर्जनाचा कार्यक्रम थांबवून लोकांच्या बचावकार्यास सुरुवात केली. या अपघातात 7 जणांचे मृतदेह सापडले असून 10 जखमींना वाचवण्यात यश आले आहे.
...आणि बघता बघता नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 9 दिवस दुर्गा मातेची पूजा केल्यानंतर बुधवारी जलपाईगुडीमध्ये विजयादशमी उत्सव साजरा केला जात होता. दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी माल नदीवर नेल्या जात होत्या. विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी असलेले लोक खूप आनंदित दिसत होते. महिला एकमेकांना सिंदूर लावून दुर्गादेवीला निरोपाचे गीत गात होत्या. तिथे मुलं एकत्र खेळ खेळत होती. सायंकाळी विधिवत विसर्जनासाठी दुर्गा मातेची मूर्ती नदीत नेण्याचे काम सुरू झाले. यावेळी अनेक महिला व पुरुषांनी नदीच्या मध्यभागी उभे राहून देवी दुर्गाला निरोप दिला. बघता बघता अचानक नदीतील पाण्याची पातळी आणि वेग वाढला. लोकांना काही समजेल तोपर्यंत नदीच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याचा वेग इतका होता की किनाऱ्यावर उभे असलेल्या लोकांनाही काहीच मदत करता आली नाही. आणि अचानक आलेल्या पुरामुळे सारं काही उध्वस्त झाले.
Anguished by the mishap during Durga Puja festivities in Jalpaiguri, West Bengal. Condolences to those who lost their loved ones: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022
लोकांचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल
पाण्यात वाहत चाललेले लोक जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होते, मात्र नदीच्या भीषण रूपासमोर नदीत उतरण्याचे धाडस कोणीच करत नव्हते. त्यामुळे अनेक महिला व पुरुष पुराच्या पाण्यात वाहून गेले. अपघात होताच घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. घटनेनंतर लगेचच जिल्हा प्रशासनाने विसर्जनाचा कार्यक्रम थांबवून बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत काही जणांना प्रशासनाने वाचवले, मात्र अनेकांचा अद्यापही काही पत्ता नाही. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रात्री उशिरापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले
अपघाताची माहिती पोलिस व प्रशासनाला मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफचे जवान मदत आणि बचावकार्य करत आहेत. पथकाने रात्री उशिरापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. काही लोक जखमीही झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.