(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला, हजारो लोकांचा मृत्यू, 11 सप्टेंबर आहे 'या' घटनांचा साक्षीदार
11 September In History : आजच्या दिवशी 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्याने अमेरिका पुरती हादरली होती. कारण या हल्ल्यात तब्बल 2996 लोक मारले गेले होते.
मुंबई : अमेरिकेच्या इतिहासात आजच्या दिवसाला काळा दिवस मानले जाते. कारण याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्याने अमेरिका पुरती हादरली होती. कारण या हल्ल्यात तब्बल 2996 लोक मारले गेले होते. त्यामुळेच 11 सप्टेंबर 2001 हा अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. या दिवशी 19 अल-कायदा दहशतवाद्यांनी चार प्रवासी विमानांचे अपहरण केले आणि त्यापैकी दोन न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर धडकवले. यामध्ये विमानातील लोकांसह इमारतीमधील हजारो लोक मृत्युमुखी पडले. इस्लामिक अतिरेकी गट अल कायदाने अफगाणिस्तानमधून हे भयाणक हल्ले घडवले होते. यासोबतच 11 सप्टेंबर हा दिवस इतिहासातील अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर 1665 मध्ये भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले होते. शिवाय दुसरे महायुद्धात रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे तब्बल 11,500 नागरिक ठार झाले होते.
1906 : महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग महात्मा गांधी यांनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये 11 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी यांनी प्रथमच सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. याच दिवशी त्यांनी पहिल्यांदाच सत्याग्रह हा शब्द वापरला.
1942 : आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले
राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राचे गीत. आपल्या मनात आपल्या राष्ट्राविषयी जे प्रेम वाटते, जो आदर वाटतो ते व्यक्त करणारे हे गीत. प्रत्येक देशाचे आपापले राष्ट्रगीत असते. थोर कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत रचले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या गीताचे हिंदी रूपांतर केले आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक हे गीत गात असत. 11 सप्टेंबर 1942 ला आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.
1944 : दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 11,500 नागरिक ठार
भारतीय वायुसेना हा भारतीय सशस्त्र दलाचा सर्वात नवीन भाग आहे, ज्याची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिश राजाचे सहायक हवाई दल म्हणून केली होती. तेव्हा ते रॉयल इंडियन एअर फोर्स म्हणून ओळखले जायचे. स्वातंत्र्यानंतर यातील रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला आणि भारतीय हवाई दल हा शब्दप्रयोग प्रचलित करण्यात आला. दसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्सने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 11,500 नागरिक ठार झाले होते.
1965 : भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
5 ऑगस्ट 1965 रोजी 33 हजार पाकिस्तानी सैनिक वेशांतर करुन काश्मिरी खोऱ्यात घुसले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1965 रोजी भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानवर हल्ला केला. भारताच्या शूर सैनिकांनी पाकिस्तानमधील 8 किमी अंतरावरील हाजीपीर खिंड काबीज केली. येथूनच पाकिस्तान घुसखोरांना प्रवेश मिळवून देत असे. भारताने कारगिल ताब्यात घेतले. 15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले आणि काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. परंतु, त्यानंतर 1 सप्टेंबर 1965 रोजी पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केले. पाकिस्तानला वाटले की, भारतीय सैन्य आधुनिक शस्त्रे, रणगाडे आणि दारूगोळा स्पर्धा करू शकणार नाहीत आणि पाकिस्तान अखनूर काबीज करू शकेल . पाकिस्तानने अखनूरवर केलेल्या जोरदार हल्ल्याने भारत सरकारला आश्चर्याचा धक्का बसला. भारताचे तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी एअर मार्शल अर्जुन सिंग यांना त्यांच्या घरी बोलावून विचारले की आम्ही पाकिस्तानवर किती वेळात हवाई हल्ला करू शकतो. अर्जुनसिंग यांनी तत्परतेने पंधरा मिनिटांत असे उत्तर दिले. त्याच वेळी छांबमध्ये जोरदार हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे पुन्हा धुळीस मिळाले.
दुसरीकडे 6 सप्टेंबर 1965 रोजी भारताने पंजाब आणि राजस्थानची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जोरदार हल्ला चढवला. मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य इछोगिल कालव्यापर्यंत पोहोचले. भारत आंतरराष्ट्रीय सीमेवरून हल्ला करेल याची पाकिस्तान कल्पना देखील करू शकत नव्हता. लाहोरला धोका असल्याचे पाहून पाकिस्तानने आपल्या सैन्याचा मोठा भाग पंजाबकडे वळवला. त्यामुळे काश्मीरमधील त्यांचा दबाव कमी होऊ लागला. तोपर्यंत भारतीय सैन्याने बाटापूर, बर्की ताब्यात घेतले होते.
1997 : नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
नासाकडून मार्स ग्लोबल सर्वेयर (MGS) अंतराळयान 1996 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. मंगळाच्या वातावरणातील दीर्घकालीन ट्रेंडचे निरीक्षण करणे आणि पृष्ठभागावरील भूगर्भीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागांवरील डेटा संकलित करण्यासह भविष्यातील मंगळ मोहिमांना सपोर्ट करणे हे यानचे कार्य होते. 11 सप्टेंबर 1997 रोजी हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.
2001 : वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी
अमेरिकेच्या इतिहासात आजच्या दिवसाला काळा दिवस मानले जाते. कारण याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्याने अमेरिका पुरती हादरली होती. कारण या हल्ल्यात तब्बल 2996 लोक मारले गेले होते. त्यामुळेच 11 सप्टेंबर 2001 हा अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. या दिवशी 19 अल-कायदा दहशतवाद्यांनी चार प्रवासी विमानांचे अपहरण केले आणि त्यापैकी दोन न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर धडकवले. यामध्ये विमानातील लोकांसह इमारतीमधील हजारो लोक मृत्युमुखी पडले. इस्लामिक अतिरेकी गट अल कायदाने अफगाणिस्तानमधून हे भयाणक हल्ले घडवले होते.