(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातून निघालेल्या टँकरला धडकली कार, भीषण अपघातात 10 ठार
वडोदरा येथून निघालेली ही कार अहमदाबादला जात होती. कारमधून 10 प्रवासी प्रवास करत होते
Accident News : गुजरातच्या अहमदाबादमध्ये भीषण अपघाताची (Accident) घटना घडली असून दुर्दैवी घटनेत १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुजरातच्या अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस वेवरील नडियादजवळील हा भीषण अपघात झाला. ऑईल टँकरच्या पाठीमागून जोरात आलेली कार टँकरल जाऊन धडकल्याने ही घटना घडली. टँकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा टँकर एक्सप्रेस (Express Way) वेवर रस्त्याच्या बाजुला उभा होता. पुण्यातून (Pune) निघालेला हा टँकर जम्मूकडे जात असताना बिघाड झाल्याने वाटेतच थांबला होता. मात्र, दुर्दैवाने या टँकरला धडकून कारमधील प्रवाशांचा जीव गेला.
वडोदरा येथून निघालेली ही कार अहमदाबादला जात होती. कारमधून 10 प्रवासी प्रवास करत होते, दुर्दैवाने एक्सप्रेस वेवर टँकरला धडक बसल्याने कारमधील 10 पैकी 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरीत दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये 8 पुरुष, 1 महिला आणि एका 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण केल होते. त्यानंतर, दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, त्यातून रुग्णालयात नेण्यात आले.
अपघाताची घटना भीषण होती, त्यामुळे अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिकांना परिश्रम घ्यावे लागले. कारमधील मृतदेहांची अद्यापही ओळख पटली नाही. पण, पोलिसांकडून कारच्या नंबरवरुन गाडीमालकाचा शोध घेण्यात येत आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
#WATCH | Ahmedabad, Gujarat: 10 people died in a road accident that took place on Vadodara-Ahmedabad Expressway. pic.twitter.com/rIGVpgppQK
— ANI (@ANI) April 17, 2024
दरम्यान, या एक्सप्रेस वेवर 100 च्या गतीने वाहने धावत असतात. आज रामनवमी असल्याने वाहनांची वर्दळ तुलनेने कमी होती. मात्र, पाठीमागून येऊन उभ्या असलेल्या टँकरला कार धडकल्याने अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी, विशेष समितीही नेमण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
दहावी बोर्डात 24 वा, UPSC परीक्षेत देशात 42 वा; मोठ्या पगाराची नोकरी सोडून बनला अधिकारी