HSC Exam : राज्यभरात आजपासून 12वीची परीक्षा, संवेदनशील परिक्षा केंद्रांवर CCTV, GPS लाइव्ह ट्रॅकिंगसह अद्यावत यंत्रणा
HSC Exam : राज्यभरात आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्ती व्हावी या अनुषंगाने संबंधीत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

HSC Exam : राज्यभरात आजपासून (11 फेब्रुवारी) बारावीची परीक्षा (HSC exam) सुरू होत आहे. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2015 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी राज्यात एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली असून त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. तर यंदा 37 तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. दुसरीकडे ही परीक्षा 'कॉपीमुक्ती' व्हावी या अनुषंगाने संबंधीत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर राज्यभरत 271 भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहे.
अशातच, राज्याची उपराजधानी नागपूर विभागात बारावीचे 1 लाख 58 हजार विद्यार्थी परीक्षा (HSC) देणार आहेत. यासाठी परीक्षा केंद्रांवर काटेकोर नियमांची अंमलबजावणी केल्याचं सांगितलं जातंय. तर प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंगसह व्हिडीओ चित्रीकरणंही केलं जाणार आहे. तसेच संवेदनशील परिक्षा केंद्रांवर CCTV देखील लावण्यात आले आहे. दरम्यान, कुठल्याही परिक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास ते केंद्र कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे ही सांगितलं जातंय.
गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द
दरम्यान, 2018 पासून जे गैरप्रकार घडले त्या केंद्रावरील केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई बदलले असून या केंद्रांवर तटस्थ शाळेचे स्टाफ नियुक्त करण्यात आले आहेत. किंबहुना यावर्षी परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, असे निर्देश ही देण्यात आले आहे.
'पाथर्डीकर जागे व्हा,कॉपी प्रकरणाला पाठबळ देणाऱ्यांचा निषेध करा'
बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातील अनेक चौकात "पाथर्डीकर जागे व्हा, कॉपी प्रकरणाला पाठबळ देणाऱ्यांचा निषेध करा" या आशयाचे बॅनर अज्ञात समाज सेवकांनी लावले आहेत. हे फलक शिक्षण विभागात चर्चेचा विषय ठरले आहे. इयत्ता 10 वी आणि 12वी परीक्षेच्या तोंडावर हे फलक शिक्षण विभागाला आणि पाथर्डीकरांना कॉफी मुक्तीसाठी साद घालणारी ठरत आहे.
अज्ञातांनी लावलेले बॅनर एक प्रकारे पाथर्डी तालुक्यात दरवर्षी होत असलेल्या कॉपी प्रकरणावर शिक्कामोर्तबच करत आहेत. तालुक्यातील काही विद्यालयात सर्रासपणे चालत असलेल्या कॉपी प्रकरणामुळे तालुक्याचे नाव बदनाम झाले आहे. तुमच्या पाल्याला आमच्या विद्यालयात ऍडमिशन द्या, हमखास चांगल्या मार्कानी पास करून देण्याची हमी देत काही संस्थाचालकांनी आजपर्यंत लाखो रुपयांचा धंदा केला आहे. त्यावर एकप्रकारे पाथर्डीकरांना कॉफी मुक्तीसाठी साद घालण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

