Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीत पुन्हा 'सांगली पॅटर्न', हिंगोलीच्या जागेवर ठाकरेंनी उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसचे नेते अपक्ष रिंगणात
Hingoli Assembly Constituency : हिंगोली विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
हिंगोली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात (Hingoli Assembly Constituency) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) रुपाली पाटील (Rupali Patil) यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचे चित्र आहे. आता काँग्रेसचे (Congress) इच्छुक उमेदवार हिंगोलीतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने 'सांगली पॅटर्न'ची (Sangli Pattern) हिंगोलीत पुनरावृत्ती होणार असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सांगली लोकसभेची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करून विशाल पाटील यांना उमेदवारी दिली होती. सांगली लोकसभेच्या जागेवर विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता. अपक्ष निवडणूक लढलेल्या विशाल पाटील यांना सांगलीतील काँग्रेस आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मदत केली होती. सांगलीच्या जागेवर ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे सांगली पॅटर्नची राज्यभरात चर्चा रंगली होती.
काँग्रेस नेते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे असताना उद्धव ठाकरेंनी रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार भाऊ पाटील-गोरेगावकर (Bhau Patil Goregaonkar) यांनी अपक्ष लढणार असल्याचे नुकतंच जाहीर केलं होतं. आज मोठे शक्ती प्रदर्शन करत भाऊ पाटील गोरेगावकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे हिंगोली विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार रुपाली पाटील सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रुपाली पाटील यांच्या वतीनेदेखील आज मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. तर आता सांगली पॅटर्न हिंगोलीतही यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या