Konkan Rain Alert: कोकणात पावसाचा हाहाकार! वाशिष्ठीसह अनेक प्रमुख नद्यांना पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, वाचा सर्व अपडेट्स
Maharashtra Rains : कोकणात सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार बघायला मिळत आहे. अशातच उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Maharashtra Rains : कोकणात सलग पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार बघायला मिळत आहे. अशातच उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदीला पूर आल्याने पुराचे पाणी शहराच्या विविध भागांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. खेड तालुक्यात जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये तसेच बाजारपेठेत शिरले आहे. शासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे.
दुसरीकडे, चिपळूणमध्ये देखील पावसाचा जोर (Maharashtra Rain Weather Alert) वाढला आहे. शहरात वाशिष्ठी आणि शिव नद्यांचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. चिंच नाका येथे पाणी साचले असून, शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नदीकाठच्या व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे. आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा शहरात तैनात आहे. प्रशासनाने नागरिकांना 'गरज असेल तरच घराबाहेर पडा' अशा सूचना दिल्या आहेत.
आंबा आणि अनुष्कुरा घाटांमध्ये दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाची स्थिती आहे. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर आणि दर्याखोऱ्यांमध्ये पाऊस प्रचंड वाढला आहे. परिणामी आंबा आणि अनुष्कुरा घाटांमध्ये दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे आता अनुष्कुरा घाटातील वाहतूक एकेरी सुरू झाली आहे. आठ प्रमुख नद्यांपैकी पाच नद्या इशारा पातळीजवळ पोहोचल्या आहेत, तर एक नदी धोका पातळीच्या वर गेली आहे. रत्नागिरीच्या उत्तर भागात, खेड, चिपळूण, दापोलीमध्ये पाऊस आहे. रायगडमधील नागोठणा पट्ट्यात अंबा आणि कुंडलिका नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. सिंधुदुर्गमध्ये तुलनेने दिलासादायक स्थिती असली तरी, समुद्र किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार असून, समुद्र खवळलेला आहे.
रायगड जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता
रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. कालच्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा तालुक्याला बसला. त्यानंतर महाड तालुक्यातील काही गावांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंडलिका, अंबा, सावित्री या प्रमुख नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. रात्री झालेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग माणगावजवळच्या निकाळजे नदीच्या पाण्यामुळे ठप्प झाला होता. आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. निकाळजे नदीने धोका पातळी ओलांडून परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण केली होती. माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासी वाडीलाही पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला. तेथे अडकलेल्या पंधरा नागरिकांना काल बाहेर काढण्यात आले. येत्या काही तासांत पावसाचा जोर असाच राहिल्यास रायगड जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
























