एक्स्प्लोर
ग्रामदेवता: नागपुरच्या सावनेर तालुक्यातील हेमाडपंथी शिवमंदिर
नागपूर: नागपूरपासून 42 किलोमीटर अंतरावर सावनेर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या सावनेरपासू अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हे हेमाडपंथी शिवमंदिर आणि तिथले वाळूचे अत्यंत प्राचीन शिवलिंग म्हणजे पंचक्रोशीतील लोकांचे ग्रामदैवत. कोलार नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर 11 व्या शतकातील असून याचे अनेक धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक दाखले आहेत. हेमाद्री कारागिरांनी हेमाडपंथी शैलीत निर्माण केलेले टुमदार मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तसेच ही यमराजाची सासुरवाडी असल्याची आख्यायिका आहे.
पौराणिक महत्त्व
पौराणिक पुराव्यानुसार, या ठिकाणी द्वापर युगात पांडवांच्या काळात शिवलिंग स्थापित करण्यात आल्याचे सांगितले जाते. जैमिनी अश्वमेघ या पौराणिक ग्रंथानुसार सावनेरचे परिसर 'सास्वतःपुर' म्हणून ओळखले जात असे. द्वापर युगात महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी अश्वमेघ यज्ञ केला. दिग्वीजयावर निघालेल्या पांडवांना याच ठिकाणी वीरवर्मा राजाच्या पाच मुलांनी आवाहन दिले. युद्धात पाचही मुलांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण मालिनीने युद्ध सुरु ठेवले, आणि विजयासाठी स्वतःच्या हातांनी वाळूचे शिवलिंग निर्माण करुन तपश्चर्या केली. मालिनीच्या तपश्चर्येमुळे श्रीकृष्णांनी हस्तक्षेप करत युद्ध थांबविले आणि नारदाच्या मदतीने मालिनीचा विवाह यमराजासोबत लावून दिला. तेव्हापासून या ठिकाणी मालिनीने स्थापन केलेल्या वाळूच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. तसेच हे ठिकाण यमराजची सासुरवाडी म्हणून ही प्रसिद्ध आहे.
11 व्या शतकात हेमाद्री कारागिरांनी हेमाडपंथी मंदिराची निर्मिती
काळाच्या ओघात या ठिकाणी असलेले जुने मंदिर नष्ट झाले आणि 11 व्या शतकात हेमाद्री कारागिरांनी हेमाडपंथी पद्धतीने वर्तमान मंदिर उभारले. हेमाडपंथी कारागिरांप्रमाणेच मंदिराची बांधणी अगदी साधी, कमी कलाकुसर आणि कमी शिल्प असलेली आहे. मंदिरात सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी तिहेरी रचना असून मंदिर कोलार नदीच्या काठावर पश्चिमाभिमुख वसलेले आहे. प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा आहे, तर गर्भगृहात प्राचीन शिवलिंग आहे.
परिसरातील अनेक लोक वर्षानुवर्षे नित्यनेमाने या मंदिरात येत असून या ठिकाणी मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांचे मान्यता आहे. शिवाय अनेक भाविक हे जागृत शिवलिंग असल्याची प्रचिती आल्याचे दावे ही करतात.
ऐतिहासिक महत्त्व
या मंदिराचे ऐतिहासिक दाखले देखील मिळतात. मोगल राजा औरंगजेबच्या सैन्याने या परिसरात अनेक मंदिरे उद्वस्थ केली होती. त्याकाळी या शिवमंदिराचे ही नुकसान करण्यात आले होते. त्यामुळे तेव्हाचे भग्नावशेष आजही या भागात पाहायला मिळतात.
या शिवमंदिरात सावनेर तालुक्यातील भाविकांसह संपूर्ण जिल्ह्यातून लोकं दर्शनाला येतात. दर सोमवारी तसेच शिवरात्रीला या ठिकाणी विशेष पूजा आयोजित केली जाते. शिवाय परिसरातील नागरिकांकडून दररोज सकाळ संध्याकाळ भजन, कीर्तन असे कार्यक्रम सुरु असतात.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement