रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी यांचं मराठीप्रेम जागृत होतं; ठाकरे बंधुंवर भाजपच्या आमदाराची टीका
Parinay Fuke On Thackeray Morcha : म मराठीचा की महानगरपालिकेचा? असा प्रश्न भाजप नेते परिणय फुके यांनी केला. हिंदीच्या मुद्द्यावरून काढण्यात येणाऱ्या मोर्चावरुनही त्यांनी टीका केली.

गोंदिया : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध सुरू केला असून 5 तारखेला मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. यावर भाजपचे नेते परिणय फुके यांनी ठाकरे बंधुंना टोला लगावला आहे. म मराठीचा की महानगरपालिकेचा असा सवाल त्यांनी विचारला. तसेच ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्याकरता यांचे मराठीप्रेम जागृत होतं अशी टीकाही परिणय फुकेंनी केली.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला ठाकरे बंधुंनी विरोध केला आहे. येत्या 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत. हे सरकारसाठी एक मोठं आव्हान असेल. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते परिणय फुके यांनी ठाकरेंवर टीका केली. दोन्ही ठाकरे बंधुंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असा प्रश्न परिणय फुके यांनी केला.
दोन भावजया एकत्र आल्या पाहिजेत
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा सर्वत्र सुरू असताना यावर परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही होत नाही, दोन्ही भावजया एकत्र यायला पाहिजेत. तर काहीतरी होऊ शकेल असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंना भाजपच्या मांडीवर येऊन बसायचे आहे का?
उद्धव ठाकरे यांनी भाजपने ज्यांना मांडीवर घेतला आहे ती असली शिवसेना नाही असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला होता. यावर परिणय फुके यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला, उद्धव ठाकरे यांना भाजपच्या मांडीवर येऊन बसायचे आहे का? असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या मनात असलेलं तोंडात आलं आहे असेही फुके म्हणाले.
मला शिंगावर घेतलं तर शिवसेनेचं शिंग तुटेल
नरेंद्र भोंडेकर यांनी माझ्यावर आणि भाजपवर टीका केलेली नाही. माझं वजन जास्त आहे, मला शिंगावर घेतलं तर शिवसेनेचं शिंगच तुटेल असं प्रत्युत्तर परिणय फुकेंनी शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिलं. तसेच भोंडेकर यांनी आपल्याला फोन करून देखील सांगितलं की त्यांनी आपल्यावर नाही तर पक्षातल्या काही लोकांवर ते वक्तव्य केलं होतं. भाजप किंवा माझ्यावर ते वक्तव्य केले नाही असेही भोंडेकर यांनी सांगितल्याचं परिणय फुके यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगेंवर टीका
मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून परिणय फुके यांनी मनोज जरांगे वर चांगलीच टीका केली. निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात आणि निवडणूक झाली की बिळात जाऊन लपतात अशी टीका परिणय फुके यांनी केली. मनोज जरांगे स्टंटबाजी करतात, त्यांना मराठा आरक्षणाचं काही देणंघेणं नाही असा आरोपही परिणय फुके यांनी केला.
ही बातमी वाचा:


















