मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
अटीतटीची वेळ असते तेव्हा शेतकरी मायबापासाठी सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी ही अटीतटीची लढाई आहे.

जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला इशारा दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अतिवृष्टीचे अनुदान देखील मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आता, नागपूर येथे सुरू असलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील नागपूरला (Nagpur) निघाले आहेत. दरम्यान, नागपूर येथे सरकारच्या वतीने शिष्टमंडळ पोहोचले असून मंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांची बच्चू कडू यांच्यासमवेत बोलणी सुरू आहेत. यावेळी, बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही जाहीर केलंय
अटीतटीची वेळ असते तेव्हा शेतकरी मायबापासाठी सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी ही अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, म्हणून आम्ही तिकडे निघालो आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी नागपूरला निघताना म्हटले.
बच्चू कडूंनी सांगितली आंदोलनाची पुढील दिशा
सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. आपली मुख्य मागणी कर्जमुक्तीची आहे, त्यासाठी सरकारची तयारी आहे. मात्र, ते तारीख सांगणार नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे. आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला गेलो तरी आंदोलन थांबवणार नाही, शांततेत आंदोलन सुरू ठेऊ, असे कडू यांनी म्हटले. मी चर्चेला जाणार, कोणा कोणाचा माझ्यावर विश्वास आहे सांगा? आपण आंदोलन संपवून जाणार नाही. चर्चेसाठी काही लगेच जाणार नाही, चर्चेत कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर आपण परत येऊन रेल्वे रोखू, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आपण आंदोलन थांबवायचे की सुरू ठेवायचे हे ठरवू. मात्र, उद्या राज्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रहाराचे कार्यकर्ते जातील आणि कर्जमाफीबद्दल मागणीचे निवेदन तहसीलदारांना देतील, असेही कडू यांनी जाहीर केले.
वाहतूक कोंडी सुटणार, आंदोलन मैदानात जाणार
दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागपूरकरांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. या आंदोलनातील गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, आता हे आंदोलन येथील महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर शिफ्ट होणार आहे. त्यामुळे, नागपूरकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटेल असे दिसते. हे आंदोलन आता जामठा येथे महामार्गावर होणार नाही तर परसोडी येथे जे मैदान मुळात आंदोलनासाठी निश्चित केलं होतं, त्याच मैदानावर होईल. महामार्गावरील सर्व ट्रॅक्टर आणि वाहन हटवून परसोडी मैदानावर आणले जातील, अशी माहिती आहे.
























